कथित ‘स्टिंग ऑपरेशन’च्या मुद्दय़ामुळे पोलिसांपुढे तपासाचा नवा पेच

वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या घरी सहाय्यक (बडी) म्हणून कार्यरत असलेल्या देवळालीच्या तोफखाना केंद्रातील जवानाने गळफास घेतल्याच्या प्रकरणात गुंतागुंत वाढली असून पोलीसही चक्रावले आहेत. लष्करी अधिकाऱ्यांच्या घरी काम करणाऱ्या सहाय्यकांना कशा पध्दतीने राबवून घेतले जाते, याबद्दल समाज माध्यमांवर ‘व्हायरल’ झालेल्या कथित ‘स्टिंग ऑपरेशन’शी  या आत्महत्येचा संदर्भ जोडला जात आहे. संबंधित जवानाने पिळवणुकीबद्दल तक्रार दिल्याची शक्यता आहे. ते व्हायरल झाल्यानंतर बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह गुरूवारी लष्करी हद्दीतील एका बरॅकमध्ये आढळून आला. यामुळे जवानाच्या आत्महत्येचे गूढ अधिकच वाढले आहे.

काही महिन्यांपूर्वी सीमावर्ती भागात तैनात लष्करी जवानांना कशा पध्दतीचे भोजन दिले जाते याबद्दल ‘चित्रफित’ व्हायरल झाली. त्यानंतर लष्कराने जवानांना समाज माध्यमांवर तक्रारी करण्यास प्रतिबंध केला होता. लष्कराच्या अंतर्गत व्यवस्थेनुसार दाद मागितली जावी, असे सूचित करण्यात आले. या स्थितीत अज्ञात ऑनलाईन संकेतस्थळाने देवळालीच्या तोफखाना केंद्रात स्टिंग ऑपरेशन करत जवानांना काही मुद्यांवर बोलते केल्याचे दिसते. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीला सहाय्यक कर्मचारी दिले जातात. त्यांच्याकडून कोणती कामे करून घेतली जाऊ नयेत याचे दंडक आहेत.

परंतु, हे निकष बाजुला सारून त्यांना अधिकाऱ्यांच्या मुलांची शाळेत ने-आण करणे, कुत्र्याला फिरवून आणणे, अधिकाऱ्यांच्या पत्नीला ‘ब्युटी पार्लर’मध्ये घेऊन जाणे, कपडे धुणे तत्सम कामे करावी लागत असल्याचे चित्रफितीतून समोर आले. याचा साद्यंत वृत्तान्त समाज माध्यमात येणे आणि त्याचवेळी जवानाचा मृतदेह आढळणे या गोष्टींचा संबंध जोडला जात आहे.

प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी बेपत्ता असणारे ‘गनर’ पदावर कार्यरत डी. एस. रॉय मॅथ्यूज (३३, रा. केरळ) यांनी गळफास घेतला. लष्करी भागातील बराकीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या चिठ्ठीत  नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मॅथ्यूज बेपत्ता झाल्याने तोफखाना केंद्राने कुटुंबिय व प्रशासनाला आधीच माहिती कळविली होती. मॅथ्यूज बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. मॅथ्यूज गनर पदावर असले तरी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी त्यांची नियुक्ती होती. तपास सुरू असून या प्रकरणाची शनिवापर्यंत  स्पष्टता होईल, असे पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.

देवळाली तोफखाना केंद्रातील जवान मॅथ्यूज्च्या आत्महत्येची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जाईल. देवळाली कॅम्प परिसरात नेमके कुठले ‘स्टिंग ऑपरेशन’ झाले आणि त्यात काय तथ्य होते याचाही तपास जलदगतीने करण्यात येणार आहे.  – सुभाष भामरे, (संरक्षण राज्यमंत्री)