* सहा महिन्यात एकही जनावर ताब्यात नाही

*  सिडकोतील घटनेनंतर जाग

शहरात मोकाट जनावरांनी अक्षरश: धुडगूस घातला असताना त्यांना पकडण्याची जबाबदारी महापालिकेच्या ज्या पशुवैद्यकीय विभागावर आहे, त्यांच्यामार्फत सहा महिन्यांत एकही मोकाट जनावर पकडण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. गाई-गुरे पकडण्यासाठी या विभागाकडे तांत्रिक मनुष्यबळ नाही. खासगी संस्थेमार्फत हे काम करावे लागते. मोकाट जनावरे पकडण्यात कोणत्याही संस्थेने रस न दाखविल्याने हे काम ठप्प आहे.

सिडकोतील सात वर्षांचे बालक आणि वृद्धेवर मोकाट गाईंनी हल्ला चढविल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे. गाई-गुरांना हाताळणाऱ्या गो शाळेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने मोकाट जनावरे पकडण्याची कार्यवाही तातडीने सुरू केली जाणार आहे. या संदर्भात पालिका आयुक्तांशी चर्चा झाली असून असे प्रकार रोखण्यासाठी तातडीने मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी सांगितले. शहरात सर्वत्र मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. मुख्य रस्ते, मध्यवर्ती भागातील वर्दळीचे मुख्य बाजार, भाजी बाजार असा कोणताही परिसर त्यास अपवाद नाही. मोकाट जनावरे कधी बिथरतील, याचा नेम नसतो. रस्त्यात ठाण मांडणाऱ्या कळपामुळे वाहतुकीस अडथळे होतात. यापूर्वी मोकाट जनावरांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या प्रश्नावर स्थायी समितीसह सर्वसाधारण सभेत सदस्यांनी अनेकदा लक्ष वेधूनही कोणताही उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोकाट जनावरांवर कार्यवाहीची जबाबदारी पशुवैद्यकीय विभागावर आहे. गाई, म्हशी, गुरे पकडण्यासाठी आपल्याकडे तांत्रिक मनुष्यबळ नसल्याचे कारण या विभागाने पुढे केले. हे काम त्रयस्थ संस्थेवर सोपविले जाते. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून तिची मुदत १० जानेवारीपर्यंत असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सूचित केले. मोकाट जनावरे पकडण्यासाठी संस्था न मिळाल्याने सहा महिन्यांपासून शहरात एकही मोकाट जनावर पकडले गेलेले नाही. कोंडवाडा व्यवस्थापन नियमावलीनुसार मोकाट जनावर पकडून १० दिवस ठेवावे लागते. या काळात मालक आल्यास दंडात्मक कारवाई करून जनावर दिले जाते. मोकाट जनावरांवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याची किंमत नागरिकांना मोजावी लागत आहे. सिडकोतील घटनेच्या पाश्र्वभूमीवर, असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून स्थानिक गोशाळेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने तातडीने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू आहे.