13 December 2019

News Flash

बहुतांश भागात पावसाची विश्रांती

चोवीस तासात जिल्ह्य़ात केवळ २२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

(संग्रहित छायाचित्र)

मागील दोन ते तीन आठवडे कधी मुसळधार, तर कधी भुरभुर स्वरूपात आपले अस्तित्व दाखविणाऱ्या पावसाने मंगळवारी जिल्ह्य़ातील बहुतांश भागातून उघडीप घेतली आहे. चोवीस तासात जिल्ह्य़ात केवळ २२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या हंगामात आतापर्यंत तब्बल १७८ हजार ८०७ मिलीमीटरची नोंद झाली आहे. त्यात ऑगस्टच्या १३ दिवसांत ७,३३७ मिलीमीटरचा समावेश आहे. पावसाने उघडीप घेतल्याने काही धरणांमधून विसर्ग कायम असला तरी तो बराच कमी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे सलग १५ ते २० दिवस धरणांमधून काटेकोर विसर्ग व्हावा म्हणून कसरत करणाऱ्या पाटबंधारे विभागाला पावसाच्या विश्रांतीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

प्रारंभी जवळपास महिनाभर दडी मारणाऱ्या पावसाने नंतर अवघ्या दीड महिन्यांत संपूर्ण कसर भरून काढली. अनेक दिवस पाच ते सहा तालुक्यांपर्यंत मर्यादित राहिलेल्या पावसाने नंतर इतर भागही व्यापले. तरीही काही तालुक्यात तो अपेक्षित प्रमाणात झालेला नाही. मंगळवारी अनेक भागात पावसाने उघडीप घेतली. चोवीस तासात इगतपुरी, पेठ, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक वगळता कुठेही पाऊस झाला नव्हता. उपरोक्त भागातही तो अतिशय तुरळक स्वरूपात होता. मंगळवारी शहरासह अनेक भागात ऊन पडले होते. मागील दोन ते तीन आठवडे पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑगस्टच्या मध्यापर्यंत दुप्पट पावसाची नोंद झाली.

गतवर्षी प्रारंभीच्या अडीच महिन्यात जिल्ह्य़ात नऊ हजार ४४३ मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा हेच प्रमाण जवळपास १८ हजार मिलीमीटर इतके झाले आहे. या वर्षी सर्वाधिक ४११२ मिलीमीटर इगतपुरीत, तर सर्वात कमी २०० मिलीमीटर पाऊस नांदगावमध्ये झाला. नाशिक तालुक्यात १०२४, त्र्यंबकेश्वर ३४६०, दिंडोरी ९३४, पेठ २६११, निफाड ३८५, सिन्नर ५८८, चांदवड ३५६, देवळा २८१, येवला ४२४, मालेगाव ३९१, बागलाण ४२२, कळवण ४०१, सुरगाणा २१९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अल्प राहिले. परिणामी, जिल्ह्य़ातील अनेक भागांना टंचाईची झळ बसली. यंदा अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. पिण्याच्या पाण्याचा विषय मार्गी लागला आहे. बहुतांश धरणे ओसंडून वाहत असल्याने पूरस्थिती नियंत्रणासाठी पाटबंधारे विभागाला बरीच दक्षता घ्यावी लागली. गोदावरीच्या महापुराचा तडाखा शहरातील काठावरील भागास बसला. अनेक धरणांमधून सलग दोन ते तीन आठवडे विसर्ग सुरू आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने पाटबंधारे विभागास काहीसा दिलासा मिळाला आहे. तूर्तास गंगापूर, काश्यपीचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. गौतमी-गोदावरी, आळंदीसह पालखेड, करंजवण, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग होत असला तरी त्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे.

  • गेल्या चोवीस तासांत केवळ २२ मिलिमीटर पावसाची नोंद
  • विसर्ग घटल्याने पाटबंधारे विभागाला दिलासा
  • नागरिकांचाही सुटकेचा नि:श्वास

पाणी सोडण्याचे संकट टळणार

जिल्ह्य़ातील लहान-मोठय़ा २४ धरणांमध्ये सध्या ५६ हजार ६५१ दशलक्ष घनफूट म्हणजे ८६ टक्के जलसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणांमध्ये केवळ ६३ टक्के जलसाठा झाला होता. यंदा हे प्रमाण २३ टक्क्य़ांनी अधिक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पावसाळा संपुष्टात आल्यानंतर समन्यायी पद्धतीने पाणी वाटपच्या तत्त्वानुसार जायकवाडीला पाणी सोडण्याची चिंता असते. हा विषयही मुसळधार पावसाने धुवून काढला आहे. यंदा नाशिकमधील धरणांमधून तब्बल ८५ हजार दशलक्ष घनफूट म्हणजे ८५ टीएमसी पाणी जायकवाडीला गेले आहे. यामुळे जायकवाडी भरण्याच्या मार्गावर असून त्याच्या कालव्यातून विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे या वर्षी पाणी सोडण्याचे संकट टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

First Published on August 14, 2019 2:07 am

Web Title: stop rain heavy rain fall mpg 94
Just Now!
X