संपूर्ण जग करोना विषाणूपासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत असतांना या संकट काळात रुग्णालय, औषध, किराणा दुकान, धान्य, भाजीपाला बाजार या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मात्र जिल्ह्य़ात खासगी रूग्णालय सेवा देण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्याचा ताण सरकारी रुग्णालयांवर येत आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांनी आरोग्य सेवा न देणाऱ्या खासगी डॉक्टरांविरूध्द कारवाईचा इशारा दिला आहे.

जिल्ह्य़ात आतापर्यंत बाहेरून आलेल्या ५०० पेक्षा अधिक विदेशी नागरिकांची आरोग्य तपासणी झाली असून त्यातील काही लोकांना घरीच विलगीकरणात राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होत आहे. करोना आणि स्वाइन फ्लुच्या लक्षणांमध्ये साम्य असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बदलत्या वातावरणासह काहींना रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, बालरोग आदी अडचणी जाणविण्यास सुरूवात होत आहे.  जिल्हा तसेच शहरात आपल्या भागातील नागरिकांच्या उपचारासाठी  टाळाटाळ करून अनेक खासगी रूग्णालयांनी बाह्य़ रुग्ण विभाग बंद ठेवला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील काही मंडळी स्वतच्या आरोग्यासाठी बाह्य़ रुग्ण विभाग बंद ठेवत स्वत:ला घरात कोंडून घेत आहेत.

परिणामी जिल्ह्य़ातील प्राथमिक रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयातील बाह्य़ रुग्ण विभागात २० ते ३० टक्के गर्दी वाढली आहे. यामध्ये संधीवात, कंबरदुखी, रक्तदाब, मधुमेह आदींचे रुग्ण आढळून येत आहेत. करोनाच्या तपासणीसाठी मनुष्यबळ अपुरे पडत असतांना खासगी रुग्णालयातील गर्दी सरकारी रुग्णालयांकडे वळल्याने कामावर ताण येत आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संबंधित बंद ठेवण्यात येत असलेल्या खासगी रुग्णालयांना विशेष मार्गदर्शक सुचना देऊन बाह्य़ रुग्ण विभाग सुरू ठेवण्यास बजावले आहे. जे असे करणार नाहीत, त्यांच्याविरूध्द कारवाई करण्यात येईल, असे मांढरे यांनी नमूद केले आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी आरोग्य सेवा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या खासगी रुग्णालयांची, डॉक्टरांची माहिती मिळवून त्यांच्याविरूध्द कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. डॉक्टरांनी रुग्णसेवेला प्राधान्य देण्याचे आवाहनही डॉ. जगदाळे यांनी केले आहे.