रस्त्यांवर नेहमीप्रमाणे गर्दी; पोलिसांची संयमी भूमिका

नाशिक : करोना संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी बुधवारी रात्रीपासून राज्य शासनाच्या वतीने कठोर निर्बंध लागू करण्यात आले असले तरी गुरुवारी पहिल्या दिवशी शहरात त्याचा कोणताही परिणाम जाणवला नाही. रस्त्यांवर नेहमीप्रमाणे गर्दी दिसून आली. खासगी वाहनांची संख्याही अधिक होती. पोलिसांनी कठोर भूमिका न घेता संयम ठेवल्याने नागरिकांचे बिनदिक्कत भटकणे सुरू होते. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात मात्र निर्बंधांना बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला.

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गुरुवारी जिल्हा तसेच शहर परिसरात संचारबंदीच्या प्रभावी अमलबजावणीचा दावा पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी शहरात तसे कोणतेही चिन्ह दिसले नाही. पंचवटी परिसर, रविवार कारंजा परिसरात नागरिकांचे येणे-जाणे नेहमीप्रमाणे सुरू होते. पोलिसांकडून कोणाचीही अडवणूक करण्यात येत नव्हती. कोणालाही विचारणा होत नव्हती.

चौकाचौकात पोलिसांनी दुभाजक लावले असले तरी त्या ठिकाणी उभ्या असलेल्या पोलिसांकडून केवळ बघ्याची भूमिका घेण्यात आली. नाशिकरोडला बिटको चौकापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत एकेरी वाहतूक सुरू होती.

उड्डाणपुलाखाली भाजीपाला विक्री सुरू होती. सिडकोत संमिश्र वातावरण होते. सिडकोत निर्बंधांची प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी लोकप्रतिनिधींची बैठक बोलविण्यात येणार आहे. कॉलेज रोड, गंगापूर रोड परिसरातही निर्बंधाचा परिणाम जाणवला नाही.

शहरात अशी स्थिती असतांना जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात मात्र निर्बंधाची अमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील होते. त्र्यंबकेश्वरात करोना रुग्णांचे मृत्यू वाढल्याने गावात शुकशुकाट होता. लोक घराबाहेर पडले नाहीत. बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांकडून  हटकले जात आहे. देवळा तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांकडून मुखपट्टीचा वापर न करणारे, दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानचालकांवर कारवाई करण्यात आली. काही गावांनी इतरांसाठी गावबंदी के ली आहे.

सारं काही व्यवस्थित

राज्य शासनाने लागू केलेल्या निकषानुसार संचारबंदीच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे. पोलीस आपले काम चोख बजावत आहेत. शहर परिसरात गर्दी असली तरी तिला हटकले गेले. सारं काही व्यवस्थित होते.

– संजय बारकुंड (पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा)

पोलिसांच्या मदतीसाठी स्वयंसेवक

आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांकडून ‘स्पेशल पोलीस ऑफिसर’ एसपीओ म्हणून स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. नाशिक शहर पोलिसांकडून परिमंडळ एकमध्ये २५९ एसपीओची नेमणूक करण्यात आली आहे. हे एसपीओ पोलीस बंदोबस्तासोबत असतील. नाकाबंदी तसेच प्रतिबंधित क्षेत्रात काम करणार आहेत. त्यांना काही विशेष अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकारांचा गैरवापर काही ठिकाणी होत आहे. नागरीक, वाहनचालक यांना असा गैरप्रकार आढळल्यास त्यांनी तातडीने तेथील बंदोबस्तावरील पोलीस अंमलदार, कर्मचारी, जवळच्या पोलीस ठाण्यात याची माहिती द्यावी. तक्रारीची खात्री करून त्यांची नेमणूक रद्द करण्यात येणार आहे.