‘ऑनलाइन औषधविक्रीला विरोध’ दर्शविण्यासाठी औषध विक्रेता संघटनेने देशपातळीवर आयोजिलेल्या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. या बंदमुळे कोटय़वधी रुपयांचे व्यवहारही थंडावले. दरम्यान, संप काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी संघटनेने दिलेल्या मदतवाहिनी क्रमांकावर अनेकांनी संपर्क साधत औषधे उपलब्ध करून घेतली.ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने केलेल्या सर्वेक्षणात ‘ऑन लाइन फार्मसी’मुळे युवा वर्गात विशेषत अल्पवयीन गटात झालेले बदल लक्षात आले. त्यात ऑनलाइन फार्मसीमुळे ग्रामीण भागात जीवरक्षक औषधांचा तुटवडा जाणवेल, युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढेल, गर्भपाताची जी औषधे वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेता येत नाही, ती घरपोच मिळतील आणि या सर्वाचा समाजावर गंभीर परिणाम होईल याकडे लक्ष वेधण्यात आले. दुसरीकडे याचा विपरीत परिणाम देशपातळीवर जे औषध सेवा देतात, अशा औषध विक्रेत्यांवर होणार आहे. या प्रकारांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने बंदचे हत्यार उपसले. त्यात नाशिक जिल्हा औषध विक्रेते संघटनेच्या सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे माजी अध्यक्ष राजेंद्र धामणे यांनी सांगितले. गोळे कॉलनी परिसरातील औषध विक्रेत्यांच्या मुख्य बाजारपेठेसह चार हजारांहून अधिक औषधविक्री दुकाने बंद ठेवत संपात सहभाग नोंदविला. केमिस्ट भवन येथे औषध विक्रेत्यांची सभा झाली. त्या वेळी विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. त्यात गर्भपात, व्यसनाधीनता पसरविणारी औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देता येणार नाही, हा नियम सर्व विक्रेत्यांना लागू असताना तो ऑनलाइनला का नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन संघटनेने जिल्हा प्रशासनास दिले.
दरम्यान, बंद काळात रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठी उपलब्ध करून दिलेल्या मदतवाहिनी क्रमांकावर जो कोणी संपर्क साधेल, त्याला त्या विभागातील औषध विक्रेत्याशी संपर्क साधत औषधे उपलब्ध करून देण्यात आली. दिवसभरात विविध विभागांतून ५० हून अधिक दूरध्वनी आल्याने गरजू रुग्णांना तातडीने औषध सेवा दिली गेल्याचे धामणे यांनी सांगितले.