18 July 2019

News Flash

महिला दिन विशेष : आंतरिक वेदनांकडे दुर्लक्ष करून सामाजिक कार्यासाठी धडपड

आरती यांचे आतापर्यंतचे संपूर्ण जीवन म्हणजे एक यात्राच आहे.

आरती माने

अविनाश पाटील

समाजात अनाथ म्हणून वावरतांना येणाऱ्या समस्यांना खंबीरपणे तोंड देतानाच, इतर महिलांच्या वाटय़ाला येणारे दु:ख पाहून स्वत:च्या आंतरिक वेदना बाजूला ठेवत सामाजिक कार्यासाठी धावून जाणाऱ्या महिला विरळाच. सामाजिक प्रगतीसाठी अशाच महिलांची प्रकर्षांने गरज असून नाशिकरोड येथील नारी विकास स्वाधार केंद्राचा एक आधार झालेल्या आरती अंजली माने यांचे कार्य त्यादृष्टीनेच महत्त्वाचे.

आरती यांचे आतापर्यंतचे संपूर्ण जीवन म्हणजे एक यात्राच आहे. पंढरपूर येथे १२ जून १९८९ रोजी जन्म झालेल्या आरती यांचे बालपण अनाथपणामुळे हरविले. इतरांच्या वाटय़ाला लहानपणीचे लाड येत असताना आरती यांची मात्र भटकंती सुरू झाली. अनाथ असल्यामुळे ‘जीवन एक संघर्ष’ हा अनुभव त्यांना तेव्हांपासूनच येऊ लागला. वयाच्या १२ व्या वर्षांपर्यंत त्या पंढरपूर येथील बाबाजी नवरंग बालकाश्रमात राहिल्या. त्यानंतर त्यांना जून २००३ मध्ये नांदेड येथील सुमन बालगृहात हलविण्यात आले. परिस्थितीशी झगडत १० वीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच पूर्ण केले.

वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत त्या बालगृहात राहिल्या. वाढत्या वयामुळे बालगृहाऐवजी २००७ मध्ये नांदेडच्याच माता अनसूया शासकीय महिला वसतिगृहात त्यांना दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी वर्ष पूर्ण होत नाही तोच पुणे येथील महिला सेवाग्राम संस्थेत त्यांच्यावर काळजीवाहक म्हणून काम करण्याची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी सांभाळत असताना सहा महिन्यातच त्यांना बारामती येथील महिला वसतिगृहात पाठविण्यात आले. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या आरती यांनी या ठिकाणी वर्षभर एका रूग्णालयात परिचारिका म्हणून काम केले. यादरम्यान २०१० मध्ये विवाह झाल्यानंतर २०११ पासून त्या नाशिकमध्ये राहू लागल्या.

काही कारणांमुळे त्या पतीबरोबर न राहता नाशिकरोडच्या जेलरोड भागातील नारी विकास स्वाधार केंद्रातच वास्तव्य करू लागल्या. एका बाजूला मुलाचे संगोपन करतांनाच केंद्रात राहूनच त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. सर्वाना समजून घेण्याच्या स्वभावामुळे आरती यांच्यावर केंद्राचे संचालक व्ही. एन. दिनकर यांनी २०१७ पासून केंद्राच्या अधीक्षिका म्हणून जबाबदारी दिली. या जबाबदारीमुळे स्वाधार शोधतांनाच त्या केंद्राच्या आधार बनल्या.

सामाजिक कार्याची विशेष आवड असणाऱ्या आरती यांनी नाशिक येथे झालेल्या ब्राह्मण समाजाच्या अधिवेशनात हजारो पत्रकांचे वाटप करून प्रबोधनाचे काम केले.

‘बेटी बचाव, बेटी पढाव’ चळवळ

दोन वर्षांपूर्वी लातूर परिसरात हुंडय़ामुळे लग्न जमत नसल्याच्या कारणास्तव १२ वीतील एका मुलीने आत्महत्या केली. या संदर्भातील माहिती वाचून मन हेलावलेल्या आरती यांनी त्या ठिकाणी जाऊन नागरिकांच्या भेटी घेत त्यांना मुलींच्या जीवनाचे महत्व पटवून दिले. बीड परिसरातील खेडेगावांमध्ये जाऊन ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियान राबविले. अल्प वयात मुलींचा विवाह केल्यास उद्भवणाऱ्या शारीरिक आणि कौटुंबिक समस्यांची जाणीव करून दिली. मुलींना शिकवा असा संदेश देतांनाच अल्पशिक्षित राहिल्यास समाजात वावरतांना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते, हे उदाहरणांसह पटवून दिले. अनेकांच्या घरी जाऊन शिक्षण अर्धवट राहिलेल्या मुलींसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासह इतरही काही शिक्षण पूर्ण करण्याचे मार्ग उपलब्ध असल्याची माहिती दिली. आतापर्यंत कोणत्याही एका ठिकाणी स्थिरस्थावर होण्यापासून वंचित राहिलेल्या आरती यांची आपल्यासारखे दु:ख इतरांच्या वाटय़ाला येऊ नये म्हणून सुरू असलेली धडपड इतरांसाठीही नक्कीच प्रेरक म्हणावी लागेल.

First Published on March 8, 2019 1:10 am

Web Title: struggle for social work by ignoring the internal issues