अद्याप एक हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी; आज अंतिम मुदत

आर्थिक दुर्बल आणि सामाजिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत नामांकित शाळांमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. असे असतानाही तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नाही, माहितीचा गैरवापर तसेच शाळांची निवड करण्यात असणारा संभ्रम यामुळे अद्याप एक हजार १६० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दारिद्रय़रेषेखालील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया खुली करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या माध्यमातील ४५७ शाळांमध्ये पाच हजार ७३५ जागांवर पहिल्या टप्प्यात पूर्व प्राथमिक, प्राथमिकच्या पहिल्या वर्गासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली. यामध्ये जिल्हा परिसरातील वेगवेगळ्या माध्यमांसाठी ऑनलाइन पध्दतीने १४ हजार ९९५ पालकांनी अर्ज भरले.

पुणे येथे सोमवारी पहिली सोडत जाहीर झाली. एक किलोमीटरच्या आतील निकषानुसार पूर्व प्राथमिकच्या ७४ तसेच प्राथमिकचे तीन हजार ४४४ विद्यार्थी अशा एकूण तीन हजार ५१७ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यामध्ये नाशिक, नांदगाव, मालेगाव, येवला, सटाणा, देवळा, बागलाण, कळवण, इगतपुरी, निफाड, सिन्नर, त्र्यंबक, दिंडोरीसह १७ गटांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, ज्या शाळेत उपलब्ध जागांपेक्षा अर्ज जास्त तेथे सोडत काढण्यात आली, तसेच ज्या शाळेत उपलब्ध जागांपेक्षा कमी अर्ज आले, त्या ठिकाणी सोडतीशिवाय थेट प्रवेश देण्यात आले आहेत. पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी याआधी २६ एप्रिल ही अंतिम मुदत होती. कागदपत्रांची पूर्तता आणि अन्य कारणांसाठी संचालनालयाने ४ मेपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ऑनलाइन पध्दतीने तीन हजार ५१७ पैकी दोन हजार ३५७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. अद्याप एक हजाराहून अधिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.

दुसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही अपेक्षित प्रवेश होऊ शकलेले नाही. ऑनलाईन पध्दतीने पालकांनी अर्ज भरताना आपल्या आवडणाऱ्या शाळेसह अन्य काही शाळांची नावेही दिली. यामुळे अपेक्षित शाळा मिळाली नसल्याने पहिल्या यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेशी संपर्क साधलेला नाही. यामुळे त्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया दुसऱ्या यादीपर्यंत रखडली आहे.

कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी

दोन वर्षांपूर्वी पालकांच्या सोयीसाठी कागदपत्रे ऑनलाइन सादर करणे ही अट रद्द करण्यात आली. केवळ तुमच्याकडे काय कागदपत्रे आहेत याची माहिती द्या, असे सांगण्यात आले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी समितीकडून होत असतांना त्यात त्रुटी आढळत आहेत. यात गुगल नकाशावरून काढण्यात आलेले अक्षांश-रेखांश चुकले आहेत. सुमारे २०० पालकांनी आपले अंतर दुरूस्त करून घेत प्रवेश प्रक्रियेत पुन्हा सहभाग घेतला. तर काहींनी जात प्रमाणपत्र अद्याप सादर केलेले नाही. यामुळे ही प्रवेशप्रक्रिया खोळबंली असल्याकडे शिक्षण विभागाने लक्ष वेधले. यादीतील निवड झालेले विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी पालकांनी शनिवारी सायंकाळी चापर्यंत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.