13 August 2020

News Flash

प्रशासकीय अनास्थेमुळे दरवर्षी ९० हून अधिक विद्यार्थी शाळाबाह्य़

नाशिकपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर आदिवासीबहुल ‘गंगा म्हाळुंगी’ गाव आहे.

 

‘गंगा म्हाळुंगी’ गावात आठवीपर्यंतच शाळा

‘सर्वाना शिक्षण’ मिळावे म्हणून शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता सर्व शिक्षा अभियानासह अन्य उपक्रम सुरू आहेत. मात्र शिक्षणात सातत्य राहावे यासाठी कुठलेच प्रयत्न शिक्षण विभागाकडून होत नाही. नाशिकपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘गंगा म्हाळुंगी’ हे गाव प्रशासकीय अनास्थेचा बळी ठरले असल्याचे समोर आले आहे. गावात केवळ आठवीपर्यंत शाळा असल्याने प्रत्येक वर्षी ९० हून अधिक विद्यार्थी शाळाबाह्य़ होत आहेत.

नाशिकपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर आदिवासीबहुल ‘गंगा म्हाळुंगी’ गाव आहे. गावाच्या जवळ शास्त्रीनगर, सुभाषनगर, ठाकूरपाडा हे आदिवासी पाडे आहेत. या आदिवासी पाडय़ांमुळेच गंगा म्हाळुंगी ग्रुप ग्रामपंचायत म्हणून प्रशासकीय पातळीवर समोर आली. ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत १२ हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. अन्य मूलभूत सेवा सुविधांपेक्षा शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावात प्राथमिक शाळा आहे. मात्र आठवीनंतर पुढील शिक्षणासाठी सहा किलोमीटर अंतरावर असलेले गिरणारे गाव गाठावे लागते. सद्य:स्थितीत गिरणारे येथील शाळांमध्ये प्रवेश पूर्ण असल्याने या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतोच असे नाही. दुसरीकडे, गिरणारे गावाला जोडणारा गोदावरी पूल सध्या जीर्ण अवस्थेत असल्याने अवजड वाहनांसह प्रवासी वाहनांना या ठिकाणी बंदी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी १२ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

ही स्थिती दोन वर्षांपासून कायम असून सार्वजनिक बांधकाम विभाग पुलाच्या पुनर्बाधणीसाठी कानाडोळा करत आहे. दुसरीकडे शिक्षण अधिकाऱ्यांना साकडे घालूनही अद्याप गावात आदिवासी विकास विभागाची आश्रमशाळा सुरू झालेली नाही. या प्रशासकीय अनास्थेचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. यामुळे प्रत्येक वर्षी ९० हून अधिक विद्यार्थी वर्षांला शाळाबाह्य़ होत आहेत.

शाळाबाह्य़ झालेले हे विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून देत आहेत. काही रोजगारासाठी नाशिक, गिरणारे येथे येतात. तर काही जवळच्या शेतांमध्ये ४०० रुपये मजुरीसाठी येतात. पालक मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना घरी ठेवणे पसंत करीत असून त्यांना घरातील कामांची माहिती व्हावी, कुटुंबातील जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकाराव्या, याकडे कुटुंबीयांचा कल आहे. तर मुलींचे लहान वयातच लग्न लावून दिले जात आहे. ही परिस्थिती बदलावी यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न कमी पडत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्यां माया खोडवे यांनी व्यक्त केली.

* सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही आमच्या गावाकडे येणारा पूल धोकादायक स्थितीत आहे. गावात माध्यमिक शाळा नाही. आठवीपर्यंत शाळा. मात्र बाहेरगावी पुढील शाळेत प्रवेश मिळत नाही. यामुळे गावच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची हेळसांड झाली आहे. आम्हाला आश्रमशाळा हवी आहे. परंतु मागणीकडे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.  – नवसू फसाळे (सरपंच, गंगा म्हाळुंगी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2019 12:23 am

Web Title: students are out of school every year administrative anesthesia akp 94
Next Stories
1 उपाहारगृहांतून कांदा गायब
2 मोकाट जनावरांना पकडण्यात अपयश
3 राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धा  नाशिक केंद्रातून ‘द लास्ट व्हाईसरॉय’ प्रथम
Just Now!
X