15 August 2020

News Flash

मिश्किलतेसह आशयगर्भ सादरीकरणामुळे रंगत

‘लोकसत्ता लोकांकिका’ विभागीय प्राथमिक फेरीत विद्यार्थ्यांच्या नाटय़कलेचे दर्शन

‘लोकसत्ता लोकांकिका’ विभागीय प्राथमिक फेरीत विद्यार्थ्यांच्या नाटय़कलेचे दर्शन

नाशिक : शहरातील महाकवी कालिदास कलामंदिरातील नाटय़ परिषदेच्या सभागृहाने सोमवारी हलक्या फुलक्या मांडणीसह आशयगर्भ आणि गंभीर एकांकिकांचा अनुभव घेतला. त्यासाठी निमित्त ठरले लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या विभागीय प्राथमिक फेरीचे. या फेरीत सोमवारी पहिल्या दिवशी नाशिकसह उत्तर महाराष्टातील महाविद्यालयांनी एकांकिका सादर केल्या. वैविध्यपूर्ण विषय हे पहिल्या दिवसाचे वैशिष्टय़े ठरले.

खोल दो (के.टी.एच.एम महाविद्यालय, नाशिक)

सआदत हसन मंटो यांच्या ‘खोल दो’ या कथेवर आधारित या एकांकिकेद्वारे फाळणीच्या काळातील सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यावेळी लोकांचे झालेले हाल, धावपळ, आप्तस्वकीयांशी ताटातूट एकांकिकेव्दारे मांडण्यात आले आहे.  एकांकिकेत वडिलांचा शोध घेणाऱ्या सकिनावर झालेल्या अत्याचाराची दुर्दैवी घटना वर्तमान काळातील महिलांवरील अत्याचारांची आठवण होऊन सर्वजण शहारतात. धर्म, जात, पंथ या पलिकडे पुरूषांमध्ये महिलेला उपभोग्य वस्तु मानण्याच्या विकृतीकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

‘सुसाईड ब्रीज’ (म. स. गा. महाविद्यालय, मालेगाव)

आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक समस्येवर उत्तर म्हणजे आत्महत्या असा समज निर्माण होत असून आत्महत्येसारख्या गंभीर मुद्यावर संवाद साधण्याची गरज एकांकिकेतून मांडण्यात आली आहे.  समाजाची व्यस्त जीवनशैली तसेच पारंपरिक बंधनांमुळे येणारे दडपण यातून आत्महत्येची प्रवृत्ती तयार होते. याविषयी खुद्द मृत्यूदेवता यमराज आत्महत्या करू पाहणाऱ्या पात्रांना विनोदी पद्धतीने समुपदेशन करतांना दिसतात. ही एकांकिका करमणुकीद्वारे नैराश्य, आत्महत्या या विषयांना हात घालते. दिवसागणिक वाढत असलेल्या अपेक्षा, मृगजळामागची धावपळ आणि वास्तव याचा मेळ घालणं गरजेचं आहे, असा संदेश एकांकिका देते.

‘वेण्डेट्टा’ (झेड. बी. पाटील विद्यालय, धुळे)

‘वेण्डेट्टा’ म्हणजे सूड. ९० च्या दशकात घडणारी ही कथा रहस्यमय कलाकृती असून संपूर्ण एकांकिका एका खुनाभोवती फिरते. रजत या पात्राच्या गूढ मृत्यूची रोमांचकारी उकल करतांना एकांकिका खुलत जाते. संहितेला मानसशास्त्राचा आधार देण्यात आला आहे, े. महाविद्यालयीन जीवनात मित्र असलेल्यांमध्ये एकमेकांशी झालेले वाद, कालपरत्वे त्या वादाला लाभलेले वेगवेगळे संदर्भ यातून एकांकिकेचा गुंता वाढतो. पोलीस निरीक्षक असलेले सरपोतदार हा गुंता कसा सोडवतात, ते एकांकिकेत खुबीने मांडण्यात आले आहे.

खेळ तारूण्याचा (भोसला कनिष्ठ महाविद्यालय, नाशिक)

तरुण वयात स्वातंत्र्यांच्या नावाखाली विभक्त राहण्याच्या आकर्षणामुळे घरातील वयस्क आई-वडिलांना बेघर करण्याच्या वाढत्या विकृतीवर  एकांकिका बोट ठेवते. तंत्रज्ञान, आभासी जग यांच्यात अडकलेली तरुण पिढी स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पनेमुळे घरातील वयस्क सदस्यांना अडगळ समजू लागते. त्यामुळे कुटुंबाचा समतोल बिघडू लागतो. अशावेळी आश्रयासाठी असहाय्य वृद्धांना करावी लागणारी वणवण एकांकिकेत दाखविण्यात आली आहे. आजच्या काळात समाजाला कधी नव्हे इतकी वृद्धाश्रमाची गरज भासू लागल्याचे वास्तव  मांडतांना तारुण्यात जे पेरतो तेच पुढे भोगावे लागते हा संदेश एकांकिकेतून देण्यात आला. समाजातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांची दुखरी बाजू मांडतांना आयुष्याच्या सायंकाळी केलेल्या चुकांची गोळाबेरीज  प्रकाशात आणण्यात आली आहे.

‘मिसा’ (न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय)

मिसा मध्ये १९७४ सालाचे देशातील आणीबाणीचे वातावरण आणि सध्याच्या काळातील महाविद्यालयीन प्रतिनिधींची दादागिरी यांच्यातील साम्य दाखविण्यात आले आहे. एकांकिकेतून महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधित्वासाठी होणारे राजकारण, प्रचार, जाहीरनामे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांंचे होणारे शोषण याकडे लक्ष वेधले गेले आहे. नाटकात जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणी विरोधात उठवलेला आवाज आणि आजच्या विद्यार्थ्यांंनी केलेली हुकूमशाही विरोधी क्रांती यांची सांगड प्रतिकात्मक नाटकाच्या माध्यमातून घालण्यात आली आहे. तसेच एकांकिकेतून सत्ताधाऱ्यांकरवी यंत्रणेचा होणारा गैरवापर अधोरेखित करण्यात आला आहे.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक् शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 4:01 am

Web Title: students demonstration in play of lokasatta lokanika division primary round zws 70
Next Stories
1 रखडलेल्या बोट क्लब, कलाग्राम, मनोरंजन पार्क आदींना ‘अच्छे दिन’
2 ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीत गुणवत्तेचे दर्शन
3 स्पर्धेतून भरपूर शिकायला मिळाले; स्पर्धक आणि मार्गदर्शकांचे मत
Just Now!
X