विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा तसेच त्यांच्यामध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने शुक्रवारी विज्ञान दिनाचे औचित्य साधत आयोजिलेल्या ‘विज्ञान सर्कस’ या अनोख्या प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विज्ञान विषयातील विविध संकल्पना प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आल्या.
संस्थेच्या जु. स. रुंग्टा हायस्कुलमध्ये ‘विज्ञान सर्कस’ भरविण्यात आली. त्याचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाबक, संस्था सचिव डी. जी. कुलकर्णी, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, माईंड वर्क शॉपचे पराग जहागिरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. विज्ञान हा विषय विविध संकल्पना आणि नियम यामुळे किचकट वाटतो. वैज्ञानिक सिध्दांत आणि त्याचा दैनंदिन जीवनातील वापर ही सांगड केवळ पुस्तकात दिसून येते. विद्यार्थ्यांना ही संकल्पना प्रत्यक्षात समजावी यासाठी संस्थेने पुण्याच्या माईंड वर्कशॉप संस्थेची मदत घेत ही वैज्ञानिक सर्कस भरविली. त्यात इयत्ता पाचवी ते दहावीतील विज्ञान विषयातील भौतीक, रासायनिक शास्त्रातील काही नियम विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावत त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. न्युटनचा गतीविषयक सिध्दांतासाठी वाहनावरील वेगाचे नियंत्रण मिळवतांना कशा पध्दतीने हा सिध्दांत काम करतो याची माहिती देण्यात आली. वस्तुची घनता व द्रव्याचा प्रकार याच्याशी निगडीत सिध्दांताविषयी घासलेट, साधेपाणी आणि साबणाच्या पाण्यात चेंडु तरंगतो की बुडतो अशी उदाहरणे मांडण्यात आली. पायथागोरसचा सिध्दांत, गुरूत्वाकर्षण, वजनाचा सिध्दांत, ध्वनी तरंग, शारीरिक उर्जा, चुंबकीय तत्व अशा विविध संकल्पना सहज सोप्या पध्दतीने समजावून देण्यात आल्या. विज्ञान शिक्षक डी. यु. आहिरे, प्रल्हाद खांबेकर, मृणालिनी दारणे, वैशाली शिरसाठ, श्रावण सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना उपकरणे देऊन त्याची सखोल माहिती दिली गेली. त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.