लोकसत्ता वार्ताहर

मालेगाव : कॅम्पातील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयातील करोना उपचार केंद्रामुळे विद्यार्थ्यांवर भीतीचे सावट निर्माण झाले असून हे केंद्र अन्यत्र हलविण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार करत अखिल भारतीय विद्यर्थी परिषदेतर्फे गुरुवारी महापालिकेविरोधात हुंकार आंदोलन करण्यात आले.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता तसेच त्यांच्यावर मानसिक दडपण येऊ  नये म्हणून मसगा महाविद्यालयातील करोना केंद्र अन्यत्र हलविण्यात यावे, अशी मागणी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून सातत्याने केली जात आहे. ऑगस्ट महिन्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही यासंदर्भात महापालिकेस निवेदन दिले होते. मात्र त्यावर काहीच कारवाई न झाल्याने परिषदेने आंदोलन करत हे केंद्र तातडीने अन्यत्र हलविण्याची मागणी केली आहे. हे केंद्र स्थलांतरित न केल्यास विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परीक्षा भीतीयुक्त वातावरणात देणे भाग पडेल, असे परिषदेने म्हटले आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा १२ ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. महाविद्यालयाच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहर, ग्रामीण भागातून करोना केंद्र असलेल्या महाविद्यालयात येणाऱ्या परीक्षार्थीची मानसिकता बिघडण्याची भीती आहे.

मात्र पालिका प्रशासन त्याचा अजिबात विचार करत नसल्याचा सूर आंदोलक विद्यार्थ्यांनी लावला. हे आंदोलन सुरू असताना उपायुक्त नितीन कापडणीस यांनी आंदोलकांची भेट घेऊन विद्यार्थ्यांची परीक्षा सुरक्षित वातावरणात कशी पार पडेल यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणार असल्याचे आश्वासन दिले.