23 November 2017

News Flash

नाशिकमधील दुगाव फाट्यावर विद्यार्थ्यांचा ‘बस रोको’

बससेवा नियमित देण्याचे आश्वासन

नाशिक | Updated: September 8, 2017 2:40 PM

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी बस रोखल्या.

एसटी महामंडळाने बस फेऱ्या कमी केल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील गिरणारे भागातील बससेवेवर परिणाम झाला आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे शालेय व महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दुगाव फाट्यावर बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी दुगाव फाट्यावर २ तास बस रोखल्या. एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना नियमित बस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

एसटी महामंडळाने दुगाव भागातील शहर बस फेऱ्या कमी केल्या आहेत. या मार्गावरील अनेक बसेसची दुरवस्था झाली असून, एसटी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे बससेवा अडचणीत आली आहे. एसटी महामंडळाने सर्व ढिम्म कारभाराचा बोजा केवळ वाहक-चालकांवर टाकल्याने नागरिक आणि विद्यार्थी यांच्या संतापाचे बळी वाहक-चालक ठरत होते. या सर्व घटनेचा उद्रेक दुगाव फाट्यावर शुक्रवारी पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी बसेस रोखून संताप व्यक्त केला.  एसटी महामंडळाला याप्रश्नी अनेक निवेदने देऊनही लक्ष दिले जात नसल्याने वारंवार अनियमित येणाऱ्या बस आणि त्यात दुगाव फाट्यावर बस थांबत नसल्याने आज विद्यार्थ्यांनी २ तास बस रोखून थेट रास्ता रोको केला. स्थानिक नागरिकांनीही या रास्ता रोकोला पाठिंबा दिला. एसटी विभागाच्या वाहतूक आगर व्यवस्थापक शुभांगी शिरसाठ यांनी बससेवा नियमित देण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

First Published on September 8, 2017 2:40 pm

Web Title: students stoped bus at dugaon in nashik