रस्ता सुरक्षा पंधरवडय़ातील अभिनव उपक्रम; सुरक्षा नियमांचे पालन
एकीकडे सिग्नलवर उत्स्फूर्तपणे ‘काका.. ‘झेब्रा क्रॉसिंग पट्टी’च्या पुढे का आलात.. मागे व्हा, सीट बेल्ट लावा, हेल्मेट घाला, वाहतुकीचे नियम पाळा..’ यासह अन्य सूचनांचा सातत्याने चाललेला वर्षांव तर दुसरीकडे ‘तू कोण रे सांगणारा..’ अशा दटावणीच्या स्वरात काहींनी जाब विचारल्यावर हिरमुसणारे चेहरे अशा वातावरणात शहर वाहतुकीचे विद्यार्थ्यांमार्फत नियमन करण्याचा प्रयोग मंगळवारी पार पडला. नाशिक फर्स्ट आणि शहर वाहतूक पोलीस यांच्यातर्फे आयोजित या उपक्रमाला सामाजिक संस्था, कारखाने यांचे सहकार्य लाभले. अनेक सिग्नल्सवर विद्यार्थ्यांच्या सूचनांचे वाहनधारकांनी अदबीने पालन केले. पण, काही ठिकाणी वाहतूक नियमन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रिक्षाचालकांच्या क्रोधालाही तोंड द्यावे लागले.
रस्ता सुरक्षा पंधरवडय़ानिमित्त आयोजित या उपक्रमात थोडे थोडके नव्हे तर एक हजार विद्यार्थी आणि २५० मदतनीस व पोलीस सहभागी झाले होते. उत्तर महाराष्ट्रातील पहिले चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशनल पार्क’ साकारणाऱ्या नाशिक फर्स्ट संस्थेने या अभिनव उपक्रमाची संकल्पना मांडली. सुरक्षित वाहतुकीसंबंधीचे प्रशिक्षण संस्थेने आजवर तीन हजारहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना आधीच दिले आहे. त्यातील एक हजार विद्यार्थ्यांना घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील ३४ पैकी ३१ सिग्नल्सची निवड करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी सांगितले. प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मंगळवारी सकाळी नेमून दिलेल्या सिग्नल परिसरात दाखल झाले. शहर वाहतुकीच्या नियमाची जबाबदारी सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीत त्यांच्यावर सोपविली गेली होती. मग, त्याचे त्यादृष्टीने काम सुरू झाले. सिग्नल लागलेला असताना वाहनधारकांसमोर वाहतुकीचे नियम पाळा, सीट बेल्ट वापरा, अति घाई संकटात नेई.. असे घोषवाक्य असणारे फलक हाती घेऊन मानवी साखळीद्वारे काही विद्यार्थी उभे राहिले. काहींनी चार चाकी वाहनचालकाने सीट बेल्ट लावला की नाही, तो का गरजेचा आहे याचे महत्त्व पटवून देत दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट वापरण्याची विनंती करण्याचे काम सुरू ठेवले. त्याच वेळी अपघाताचे दुष्परिणाम, सुरक्षित अंतर याबाबत माहिती दिली गेली. सिग्नलवर जे वाहनधारक ‘झेब्रा क्रॉसिंग’ पट्टय़ाच्या पुढे येत होते, त्यांना लागलीच मागे जाण्याचा इशारा ‘शिट्टी’द्वारे केला जात होता. विद्यार्थ्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत काही वाहनधारकांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. शाब्दिक समज देऊनही वाहनचालक आडमुठेपणा करत असेल तर विद्यार्थ्यांनी गांधीगिरी पद्धतीने वाहन स्वत: लोटत मागे नेले, काहींनी तर त्या वाहनचालकाला सिग्नल सुटल्यावर ‘यू टर्न’ घेण्यास भाग पाडले. विद्यार्थ्यांच्या आवाहनाला न जुमानता काही वाहनचालक उपरोक्त पट्टय़ावर उभे राहणे, सिटबेल्ट न लावणे हे प्रकार सुरू ठेवत हे सांगणारा तू कोण, असा जाब विचारत मार्गस्थ झाले.

आम्हाला ‘चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क’मध्ये वाहतूक नियमांची माहिती दिली होती. त्याचे आम्ही प्रात्यक्षिकही केले. त्याचा फायदा होतोय, पण रस्त्यावर प्रत्यक्ष स्थिती खूप वेगळी आहे. नियमांची जाणीव करून दिल्यावर वाहनचालकांनी आमचे ऐकले. पण रिक्षावाले आपल्या वागण्यावर ठाम राहिले. त्यांनी सांगूनही सोयीस्कर दुर्लक्ष केले आणि काहींनी दमही भरला.
ऋतिक मुर्तडक
नाागरिक आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत असले तरी वाहतूक नियमांविषयी वाहनधारकांमध्ये जागरूकता नाही. सिग्नल असला तरी थांबण्याची तयारी नाही. कर्णकर्कश हॉर्न वाजवत सतत पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. वारंवार आवाहन करूनही काही वाहनचालक ऐकतात तर काहींनी ऐकले नाही. पादचारी ‘झेब्रा क्रॉसिंग’ऐवजी इतर भागातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. ज्यांनी नियमांचे पालन केले त्यांना आम्ही धन्यवादही दिले.
अनिकेत जाधव व सृष्टी म्हस्के
वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आम्हाले दिलेले प्रशिक्षण, सूचना आम्ही प्रत्यक्षात अमलात आणत आहोत याचा आनंद झाला. काही वेळा वाहनचालकांनी दुर्लक्ष केले. त्यांना आम्ही ‘घरी तुमची कोणी तरी वाट पाहत आहे’ हा फलक दाखवत अपघाताचे दुष्परिणाम समजावून सांगितले.
– वेदश्री सातपुते