यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आवारातील कामगारांना साक्षर करण्याचा ध्यास

‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीद असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ समाजातील वंचित घटक तसेच शिक्षणाच्या प्रवाहापासून कोसो दूर असणाऱ्यांना या ज्ञानगंगोत्रीत सामील करून घेण्याचे काम करत असले तरी विद्यापीठाच्या आवारातच काम करणारे चतुर्थ श्रेणी कामगार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यांना या ज्ञानगंगेत सहभागी करून घेण्यासाठी कुलगुरूंनी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ अभ्यास वर्ग सुरू करून श्रमिक कामगारांना साक्षर करण्याचा ध्यास घेतला आहे.

विद्यापीठात सफाई कामगार, सुरक्षारक्षक यासह विविध काम करणारे ६० पेक्षा अधिक श्रमिक कामगार आहेत. यातील बहुतांश कामगारांनी वयाची चाळिशी ओलांडली असली तरी यातील काहींना अद्याप अक्षर ओळखही नाही. काहींचे शिक्षण स्वाक्षरीपुरते मर्यादित आहे. वर्षभरापासून या घटकाला साक्षर करण्यासाठी सूत्रबद्ध पद्धतीने काम सुरू आहे. कंत्राटदाराकडून ठरलेले पुरेसे वेतनही या लोकांच्या हातात पडत नाही. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी शिक्षण महत्त्वाची भूमिका निभावेल या उद्देशाने कुलगुरू वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी काम करण्यास सुरुवात केली. कंत्राटदाराच्या यंत्रणेला शिस्त लावली. यामुळे कामगारांच्या हातात वेतन आणि त्याची पावतीही मिळू लागली. व्यवहारात पारदर्शकता आल्यानंतर वायुनंदन यांनी कामगारांना एकत्र करत त्यांना शिक्षण का गरजेचे, हे पटवून दिले. त्यासाठी अभ्यास केंद्र सुरू करत प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विद्यापीठाच्या आवारात वर्ग सुरू केले.

या केंद्रात एकूण ६० विद्यार्थी (श्रमिक कामगार) शिक्षण घेत आहेत. त्यांना पी.एचडीचे शिक्षण घेणारे १० विद्यार्थी गटशिक्षण पद्धतीने शिकवत आहेत. स्वत वायुनंदन या तीनही दिवशी वर्गावर जाऊन कामगार विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. अक्षर ओळख नसलेल्या या विद्यार्थ्यांच्या हातात खडू, पेन देत लहान बालकांसारखे त्यांच्याकडून अक्षर गिरवून घेत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीचा श्रीगणेशा झाला. त्यांना संगणकीय प्रशिक्षणही देण्यात येत आहे. एकीकडे शिक्षण देत असताना त्यांनी आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी त्यांचे बचत गट तयार करत त्यांना घरगुती लघु उद्योगांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

येथे काम करत असलेल्या महिला वर्गाची संख्या पाहता त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. कोल्हापूरच्या डॉ. वासंती रासम आरोग्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करतात. या महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांना विद्यापीठाच्या आवारात मोफत सॅनिटरी नॅपकीन देण्यात येत आहे. त्यांचीही नित्यनियमाने आरोग्य तपासणी करण्यात येते. महिला बाळंतपणासाठी रजेवर असताना त्यांना रोजगार दिला जात आहे.

दुसरीकडे, गोवर्धन गावातून दररोज पायपीट करत येणाऱ्या या कष्टकऱ्यांसाठी विद्यापीठाने गेल्या वर्षांपासून बससेवा सुरू केली आहे. कामगारांसोबत त्यांच्या मुलांनाही शाळेत ने-आण करण्याचे कामही बस करते. या अभ्यास केंद्राने श्रमिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलण्यास सुरुवात झाली आहे.

बाहेरचे शिकताहेत, घरच्यांचाही हक्क

शिक्षणापासून वंचित असल्याने या रोजंदारावरील कंत्राटी कामगारांना हक्काचा किमान रोजगारही पुरेसा मिळत नव्हता. मुक्त विद्यापीठ हे बाहेरच्यांना शिक्षण देत असते, पण थेट विद्यापीठाशी संबंध नसला तरी या शैक्षणिक आवारात काम करणाऱ्या लोकांना साक्षर करणे किंवा संगणक साक्षर करणे, त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी काम करावे असे मनापासून वाटले. त्यासाठीच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले आहे. शिक्षण सर्व स्तरांपर्यंत पोहचावा हा आमचा प्रयत्न आहे.

प्रा. ई. वायुनंदन  (कुलगुरू)