आज रोहिणी-चंद्र पिधान युती, शुक्रवारी उल्का वर्षांव

राज्यभरातील खगोलप्रेमींसाठी हा आठवडा अत्यंत अभ्यासपूर्ण घटनांचा ठरणार असून त्यातील पहिल्या घटनेत मंगळवारी रोहिणी आणि चंद्र यांची पिधान युती होणार आहे.  दुसऱ्या घटनेत सिंह तारका समूहातून होणाऱ्या उल्का वर्षांवाचा आनंद घेता येणार आहे, अशी माहिती नाशिकमधील खगोल अभ्यासक प्रा. गिरीश पिंपळे यांनी दिली आहे.

ही युती म्हणजे दोन आकाशीय वस्तु जवळ आल्या आहेत असा भास होणे. पिधान याचा अर्थ झाकून टाकणे. या युतीत चंद्र रोहिणीला झाकून टाकतो असे भासते म्हणून या युतीला पिधान युती म्हणतात. आकाशात रोहिणी हा तारा अगदी एखाद्या बिंदूसारखा दिसत असला तरी तरी प्रत्यक्षात तो सूर्यापेक्षा ४४२ पट मोठा आहे. त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर ६५ प्रकाशवर्ष असल्याने तो छोटा दिसतो. चंद्र रोहिणीपेक्षा खूपच लहान असला तरी तो पृथ्वीला जवळ असल्याने (सरासरी अंतर ३,८४,००० किमी) मोठा दिसतो. त्यामुळे त्याने रोहिणीला झाकून टाकल्यासारखे वाटते. रोहिणी रंगाने लालसर दिसण्याचे कारण त्याचे आयुष्य संपत आले आहे हे होय. १५ नोव्हेंबरच्या सायंकाळी सातच्या सुमारास चंद्रोदय होईल. त्याच सुमारास रोहिणी उगवेल.

रात्री आठ वाजून ४९ मिनीटांनी रोहिणी चंद्राआड जाईल आणि त्याचे ‘प्रियाराधन’ सुरू होईल. त्यानंतर सुमारे एक तासाने म्हणजे नऊ वाजून ४४ मिनीटांनी ही युती संपल्यावर रोहिणी चंद्राआडून बाहेर येईल. ही दुर्मीळ खगोलीय घटना साध्या डोळ्यानेही पाहता येईल. परंतु, द्विनेत्री किंवा दुर्बिणीचा वापर केल्यास तो आनंद नक्कीच शतगुणित होईल, असे पिंपळे यांनी नमूद केले आहे.

उल्का वर्षांव नेहमी घडणारी घटना आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात १५ तारखेच्या आसपास उल्का वर्षांव दिसण्याची शक्यता असते. हा वर्षांव सिंह तारका समूहातून झाल्याचा भास होतो. त्यामुळे त्याला सिंह उल्का वर्षांव म्हणतात. या वर्षी १८ तारखेला पहाटे दोन ते पाच या वेळेत अधिक उल्का पडताना दिसतील असा अंदाज आहे. हे निरीक्षण साध्या डोळ्यानेच करावयाचे असते. निरीक्षणाची जागा शहरापासून दूर अंधारी अशी असावी.