15 October 2018

News Flash

ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांचा यशस्वी तपास

रक्कम मिळणाऱ्या तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

तक्रारदारांचे दीड लाख रुपये परत

नवमाध्यमांचा वापर करत कॅशलेस व्यवहाराच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाण्याने ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यचा यशस्वी तपास करत तक्रारदारांना सुमारे एक लाख ४३,४१३ रुपयांची रक्कम परत मिळवून दिली. रक्कम मिळणाऱ्या तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या काही महिन्यात ऑनलाइन व्यवहारातून झालेल्या फसवणुकीबाबत ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांचे बँक खाते, डेबिट कार्डची माहिती घेत ऑनलाइन पैसे ‘ट्रान्स्फर’ करून फसवणुकीचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले. येवला, मनमाड, चांदवड, निफाड, इगतपुरी येथील काही नागरिकांच्या ‘ओटीपी’द्वारे फसवणुकीबाबत तक्रारी दाखल झाल्या होत्या. या प्रकरणांची माहिती घेत पोलिसांनी यशस्वी तपास केला. या माध्यमातून तक्रारदारांना एक लाख ४३ हजार ४१३ रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात आली. तसेच नवमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ क्लिप्स, फेसबुक, इन्स्ट्राग्राम तसेच ट्विटरवरील बनावट खाते विविध प्रकारच्या प्रकरणांचे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत संशयितांचा शोध घेतला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, पोलिसांनी आपले बँक खाते किंवा आर्थिक व्यवहाराची माहिती कोणालाही देऊ नका. कॅशलेस व्यवहारासाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या अ‍ॅप्सचा वापर करताना त्याचे संकेतशब्द कोणाला कळणार नाही याची काळजी घ्यावी, ज्यातून आर्थिक व्यवहार करायचे आहे, त्यांची सुरक्षितता तपासावी असे आवाहन केले आहे.

नवमाध्यमांचा वापर करतांना हे टाळा

  • कोणत्याही नेत्याच्या, धर्माच्या किंवा इतर संवेदनशील बाबींवर आपत्तीजनक टिप्पणी करू नका.
  • एखाद्या व्यक्तीचे बनावट खाते तयार करू नये.
  • अश्लील ई-मेल बघू नका.
  • नियमीतपणे ई-मेल, फेसबुक किंवा अन्य नवमाध्यमांचा संकेतशब्द बदलत राहा.
  • अनोळख्या व्यक्तीची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्वीकारू नका.
  • संगणक किंवा भ्रमणध्वनीवर जमा झालेली तात्पुरती डाऊनलोड माहिती, जुनी वेब पेजेस कायमस्वरूपी काढून टाकावेत.
  • नवमाध्यमांचा गैरवापर आढळल्यास पोलिसांशी संपर्क करावा.

First Published on December 7, 2017 1:26 am

Web Title: successfully investigated online fraud cases cybercrime