|| चारुशीला कुलकर्णी

प्रेमभंग, आर्थिक अडचणी, कामाचा ताण, कौटुंबिक वाद यासह क्षुल्लक कारणांवरून डोक्यात राग घालून विष घेणे, हाताची नस कापणे, झोपेच्या गोळ्या घेणे या प्रकारे आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहेत. जिल्ह्य़ात महिन्यास शंभरहून अधिक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करतात. यामध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. एकीकडे ‘आत्महत्या प्रतिबंध दिन’ साजरा केला जात असताना या धक्कादायक वास्तवास सामोरे जाण्यासाठी आणि असे प्रकार घडू नयेत, यासाठी जनजागृतीची गरज व्यक्त होत आहे.

जागतिक स्तरावर आत्महत्या ही मोठी समस्या आहे. कामाचा ताण, नैराश्य, नातेसंबंधातील हरवलेला संवाद, वाढलेल्या अपेक्षा, जीवघेणी स्पर्धा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.  या सर्व घटनांना पायबंद घालण्यासाठी १० सप्टेंबर हा ‘आत्महत्या प्रतिबंध दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या सव्‍‌र्हेक्षणानुसार भारतात दरवर्षी एक लाख लोकांमागे १०.३ टक्के लोक आत्महत्या करतात. त्याचे लिंग गुणोत्तर पुरुष आणि स्त्रियांच्या बाबतीत २:१ असे आहे. देशात एक लाख लोकांपैकी २३ व्यक्ती या आत्महत्येने जीव गमावत आहेत.

राज्यात एक लाख लोकसंख्येमागे ११.९ टक्के लोक आत्महत्या करतात. सरकारी रुग्णालयांमधून मानसिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मानसिक आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काम सुरू आहे. कामाचा ताण, तणाव, नैराश्य, व्यसनाधीनता या कारणांमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश जेजूरकर यांनी सांगितले.  काही वर्षांत सहनशक्ती संपत चालली असून ‘अजून पाहिजे’ , ‘तडजोड नको’ ही वृत्ती वाढत असल्याने हे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.

आत्महत्या रोखण्यासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य आमि आत्महत्या याबद्दल असलेले गैरसमज निवारण करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. मानसिक आजारावर नियमित स्वरूपात मानसोपचारतज्ज्ञांमार्फत उपचार केले जावेत. तसेच आपल्या संपर्कातील व्यक्ती ही ताणतणावाने ग्रासलेली असेल तर तिच्याशी संवाद साधणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी नमूद केले. घरात, नातेवाईकांशी, मित्र परिवारात सुसंवाद असणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

समुपदेशनासह औषधोपचारही

जिल्हा रुग्णालयाच्या वेगवेगळ्या विभागात महिन्यास ५० पेक्षा अधिक रुग्ण आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून दाखल होतात. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते मानसिक रुग्ण आहेत किंवा नैराश्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येते. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशनासह औषधोपचार करावा लागत असल्याचे डॉ. जेजुरकर यांनी सांगितले. विशेषत: १५ ते ३० तसेच ५० वर्षे वयापुढे हे प्रमाण अधिक आहे. यामध्ये पुरुष आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात, तर महिला आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याचे रुग्णांच्या आकडेवारीवरून दिसून येते.