18 July 2019

News Flash

महापालिकेची आजपासून सुकन्या योजना

स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर गुरूवारी विशेष सर्वसाधारण सभेत चर्चा झाली.

(संग्रहित छायाचित्र)

२०१९-२० वर्षांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी, खेडे, रस्ते विकासासाठी भरीव तरतूद, प्रभाग विकास निधीतही वाढ

महापालिकेमार्फत शुक्रवारपासून सुकन्या योजना राबविली जाणार असून त्या अंतर्गत शहरात मुलीच्या जन्मोत्सवाचे स्वागत करण्यासाठी पाच हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सर्वसाधारण सभेत महापौर रंजना भानसी यांनी ही घोषणा केली.

पालिकेच्या सहा विभागात महिलांसाठी उद्योग भवन उभारण्यात येणार असून स्थायी समितीने २०१९-२० वर्षांच्या अंदाजपत्रकास दुरुस्ती, उपसुचनांसह मंजुरी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, सत्ताधारी भाजपने सर्वपक्षीय नगरसेवकांना खुश करण्याचा प्रयत्न केला. खेडे विकासासाठी भरीव तरतूद, प्रभाग विकास निधीत वाढ करण्यात आली.

स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर गुरूवारी विशेष सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. पालिका आयुक्तांनी १८९४.५० कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात स्थायीने ८९ कोटींची वाढ करत ते १९८३.५० कोटींवर नेले. सभेत प्रभागात विकास कामे करता येत नाही, खेडय़ांची दुरवस्था आदींकडे लक्ष वेधत नगरसेवकांनी अतिरिक्त निधीची मागणी केली. सभागृह नेते दिनकर पाटील यांनी अंदाजपत्रक सादर केल्यानंतर माजी स्थायी सभापती डॉ. हिमगौरी आहेर-आडके यांनी नव्या योजनांची माहिती दिली.

दादासाहेब फाळके स्मारकाचे पीपीपी तत्वावर नाशिक फिल्म सिटी म्हणून रुपांतर, द्वारका परिसरातील मोकळ्या जागेत अटल उद्योग संकूल, टाकळी रस्त्यावरील महापालिकेच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज बँक, महात्मानगर येथे अद्ययावत जीम, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम आदींचा समावेश करण्यात आला. महिलांसाठी शहरात ‘पिंक रिक्षा’ ही योजना सुरू केली जाईल. यामुळे महिला सुरक्षा आणि सबलीकरण हे दोन्ही उद्देश साध्य होणार असल्याचे आडके यांनी सांगितले. गुरूमित बग्गा यांनी जकातीच्या उत्पन्नात वार्षिक सरासरी १५ ते २० टक्के वाढ नोंदवली जात होती. परंतु, तो कर बंद करून सरकार केवळ आठ टक्के वाढ धरून परतावा देते. त्याचा परिणाम कामांवर झाला असून राज्य सरकारने हे नुकसान भरून द्यावे, अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी त्याच मुद्याकडे लक्ष वेधले.

भाजपचे सदस्य आवर्जुन आयुक्त गमे यांचे कौतुक करत होते. मागील वर्षी अखेरच्या टप्प्यात आयुक्त बदलल्याने भाजपची अडचण झाली होती. प्रभाग विकास निधी आणि नगरसेवक निधीत वाढ करण्याचा मुद्दा अनेकांनी मांडला. सदस्यांच्या मागण्या लक्षात घेऊन महापौरांनी प्रभाग विकास निधीत वाढ करण्याचे मान्य केले. दरम्यान,सभागृहात शिवसेनेच्या हर्षदा गायकर आणि महापौर रंजना भानसी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. शिवसेनेची नगरसेविका आहे म्हणून अवमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार त्यांनी केली. अखेर महापौर भानसी यांनी नमते घेत माफी मागितली.

ठळक बाबी

*   सुकन्या योजनेंतर्गत पाच हजार रुपये

*   प्रभाग निधीत प्रति नगरसेवक २५ लाखाची वाढ

*   खेडे विकासासाठी भरीव तरतूद

*   सहा प्रभागात महिलांसाठी उद्योग भवन

*   रस्ते विकासासाठी तरतूद

*   शासन निर्देशानुसार सातवा वेतन आयोग लागू करणार

*   प्रामाणिक करदात्यांसाठी अपघाती विमा योजना

*   लोककल्याण पुरस्कार

First Published on March 8, 2019 1:12 am

Web Title: sukanya yojna from todays municipal corporation