इंजिनावर चौकशीचा मुख्य रोख

हवाई चाचणीदरम्यान कोसळलेल्या सुखोई विमानाच्या अपघाताची गंभीर दखल घेत एचएएलच्या तंत्रज्ञांनी गुरुवारी या दुर्घटनेचे कारण शोधण्याचे काम सुरू केले. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ आदल्या दिवशीच ताब्यात घेण्यात आला आहे. हा बॉक्स आणि अपघात स्थळावरील अवशेषांवरून संकलित केल्या जाणाऱ्या माहितीद्वारे पाच ते सात दिवसात अपघातविषयक प्राथमिक निष्कर्ष निघण्याचा अंदाज आहे. चौकशीचा मुख्य रोख सुखोईच्या इंजिनावर राहणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगितले जात आहे.

लढाऊ विमानांची बांधणी करणाऱ्या एचएएलचे सुखोई एमकेआय-३० विमान बुधवारी सकाळी नियमित हवाई चाचणीदरम्यान तांत्रिक बिघाड होऊन कोसळले. वैमानिक विंग कमांडर प्रशांत नायर आणि सहवैमानिकाने वेळीच हवाईछत्रीचा आधार घेत उडी घेतल्याने ते बचावले. निफाड तालुक्यातील एका शेतात हे विमान पडल्याने जीवित हानी टळली. अपघातात एचएएलचे सुमारे २५० कोटींचे नुकसान झाले आहे. सुखोईची बांधणी प्रक्रिया झाल्यावर चाचणीवेळी झालेला हा पहिला अपघात एचएएलला हादरे देणारा ठरला. रशियाच्या मदतीने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ओझरस्थित कारखान्यात दीड दशकात जवळपास १६० सुखोईंची बांधणी करण्यात आली आहे. आजवर कधीही अशा अपघाताला सामोरे जावे लागले नव्हते. ज्या शेतात विमानाचे भग्न अवशेष विखुरलेले आहेत, तो परिसर दोरखंडांनी बंदिस्त करून कोणी तिथे प्रवेश करू नये अशी व्यवस्था केली गेली.

एचएएलच्या गुणवत्ता आणि नियंत्रण विभागाचे तंत्रज्ञ, सुखोईच्या बांधणीतील तज्ज्ञ गुरुवारी दुपारी निफाड परिसरातील अपघातस्थळी गेले. सुखोईच्या अवशेषांची त्यांनी बारकाईने छाननी सुरू केली. एचएएलच्या जनसंपर्क विभागाने त्यास दुजोरा दिला. चौकशीचे काम पूर्ण होईपर्यंत घटनास्थळावरील अवशेष हटविले जाणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. या क्षेत्रातील तज्ज्ञांकडे विचारणा केली असता त्यांनी चौकशी समितीला प्राथमिक निष्कर्ष काढण्यास पाच ते सात दिवसांचा कालावधी लागू शकतो असे सांगितले.

अपघाताच्या सखोल चौकशीला वेळ लागेल. प्राथमिक चौकशीत विमानात नेमका काय दोष उद्भवला, त्याचे स्वरूप काय, तो या एकाच विमानाशी संबंधित आहे की नाही आदी बाजूने तंत्रज्ञांकडून छाननी होईल. उड्डाणा दरम्यान जोरदार कंपने होऊन इंजिनला आग लागल्याचे सांगितले जाते. शक्तिशाली सुखोईला दोन इंजिन असतात. एका इंजिनमध्ये अकस्मात बिघाड झाल्यास सुरक्षितपणे उतरण्यासाठी दुसऱ्या इंजिनची पर्यायी व्यवस्था आहे. असे असताना दोन्ही इंजिनमध्ये नेमका काय दोष झाला किंवा तिसरा काही घटक अपघातास कारक ठरला काय, याची छाननी समितीमार्फत केली जाईल.

सुखोईची नियमित चाचणी सुरळीत

सुखोईच्या अपघातानंतर एचएएल कारखान्यात सुखोईची नियमित चाचणी आणि सरावाचे काम नेहमीप्रमाणे सुरू आहे. चौकशी समिती घटनास्थळावर अपघातग्रस्त विमानाच्या अवशेषांची तपासणी करीत आहे. चौकशीचे काम पूर्ण होईपर्यंत सुखोईचे अवशेष हटविले जाणार नाहीत.  – जनसंपर्क विभाग (एचएएल)