अनिकेत साठे

करोनाच्या संकटात देशातील बहुतांश उद्योग थंडावले असतांना तसेच हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतूक (माल वाहतूक वगळता) बंद असतांना अशा परिस्थितीत सुखोई विमानांची बांधणी, दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत.

‘एचएएल’च्या ओझर प्रकल्पात टाळेबंदीची नियमावली, कामगार सुरक्षा आदींचे पालन करून निम्म्याहून कमी मनुष्यबळावर हे धनुष्य पेलण्यात आले आहे. शिवाय, आवश्यक त्या हवाई चाचण्याही पार पाडल्या जातात. बुधवारी सकाळी अशाच एका चाचणीवेळी ‘सोनिक बूम’चा आवाज झाला. गरज भासल्यास पुढील काळात सुखोईची आणखी उड्डाणे होतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सुखोई लढाऊ विमानांची बांधणी ओझरस्थित ‘एचएएल’ प्रकल्पात केली जाते. टाळेबंदीत बहुतांश उद्योग, व्यवसाय, वाहतूक थंडावली असतांना सकाळी पावणे अकराच्या सुमारास झालेला प्रचंड आवाज सामान्यांमध्ये अनेक शंका निर्माण करणारा ठरला. आवाजाने महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील भूकंप आघात सामग्री विभागही कार्यप्रवण झाला. संबंधितांनी भूकंप मापन केंद्रात धाव घेतली. परंतु, धक्क्य़ाची नोंद झालेली नव्हती. त्यामुळे आवाजाचा भूकंपाशी संबंध नसल्याचा निष्कर्ष या विभागाने काढला. आवाजाच्या कारणाचा शोध एचएएलपर्यंत येऊन थांबला.

टाळेबंदीत सार्वजनिक उद्योगातील महत्त्वाच्या ‘एचएएल’ प्रकल्पात अल्प मनुष्यबळावर सुखोईची बांधणी, संपूर्ण दुरुस्तीची कामे सुरू आहेत. कारखान्याजवळील टाऊनशीपमध्ये जे अधिकारी, कर्मचारी वास्तव्यास आहेत, केवळ त्यांनाच कामावर बोलावले जाते. व्यवस्थापनाने टाळेबंदीत अत्यावश्यक कामे करण्यास परवानगी दिलेली आहे. नियमावलीचे पालन करून ही कामे होतात. बांधणी तसेच संपूर्ण दुरुस्ती झालेल्या विमानांची चाचणी केली जाते. बुधवारी सकाळी सुखोई ओझर विमानतळावरून अवकाशात झेपावले. यावेळी ‘सोनिक बूम’चा आवाज झाला. तो शहरात सर्वदूर ऐकायला मिळाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले.

आणखी चाचणी उड्डाणे..

सर्वसाधारण वेगातून सुखोईसारखी विमाने जेव्हा ध्वनिहून अधिक गती पकडतात, तेव्हां मोठा आवाज होतो. त्याला ‘सोनिक बूम’ म्हटले जाते. पुढील काळात आवश्यकतेनुसार सुखोईची आणखी चाचणी उड्डाणे होणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तो आवाज सोनिक बूमचाच असल्याचे म्हटले आहे.