सुला विनयार्ड्स येथे होणाऱ्या सुला महोत्सवावर काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेतल्याने प्रशासनाने अटी-शर्तीसह महोत्सव घेण्यास परवानगी दिली आहे. याबाबत महोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी हमी आयोजकांनी दिल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले.
गोवर्धन शिवारात गेल्या काही वर्षांपासून देशी-विदेशी पर्यटकांसाठी सुला वाइन महोत्सव भरविण्यात येतो. या महोत्सवामुळे नाशिकची प्रतिमा मलिन होत असून संस्कृती परंपरेवर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप जागृत सुजाण नागरिक संघाने केला होता. सुला महोत्सवावर आक्षेप घेत तो रद्द करण्याची मागणी केली तसेच याबाबत प्रशासनाने कारवाई न केल्यास जनआंदोलनाचा इशारा दिला होता. या पाश्र्वभूमीवर, प्रशासनाने नोटीस बजावून आयोजकांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. हे म्हणणे मांडल्यानंतर प्रशासनाने सुला महोत्सवास काही अटी-शर्तीवर परवानगी दिली आहे. महोत्सवाच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम प्रती तिकिटाप्रमाणे १५ टक्के रक्कम ही ग्रामीण भाग व २० टक्के शहरी भागांत करमणूक कर देयक म्हणून वापरली जाईल. वेगवेगळ्या संवर्गासाठी वेगवेगळ्या रंगांची तिकिटे छापण्यात यावी, त्यावर कार्यक्रम दिनांक, प्रवेश दराची रक्कम, प्रवेश मूल्यांत देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा आदींची माहिती द्यावी, मान्यता घेण्यात आलेल्या एकूण तिकीट संख्येच्या ७ टक्के इतकी संख्या मानार्थ असेल, याबाबत करमणूक कर निरीक्षकांची मंजुरी अनिवार्य राहील. स्वाक्षरी झाल्यानंतर आयोजकांना बदल करता येणार नाही, तसा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आयोजकांनी महोत्सवात उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांची तपासणी केली जाईल आणि त्यासाठी खास पथक नेमण्यात येईल, महोत्सवाबाबत जाहिरातीचा मजकूर तपासला जाईल, महोत्सवात सांस्कृतिक मूल्य तसेच सामाजिक नीतिमूल्यांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे असून उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, तिकीट विक्रीचा परवाना पोलीस आयुक्त यांच्याकडून घेण्यात यावा, विक्री झालेल्या आणि न झालेल्या तिकिटांचा हिशोब देण्यात यावा, कार्यालयाकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ आसन व्यवस्था करणे आयोजकांना बंधनकारक करण्यात आले आहेत. याबाबत संघाचे संजय करंजकर यांनी समाधान व्यक्त केले.