वाइन निमिर्तीत गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्के वाढ

देशातील आघाडीचे वाइन उत्पादक असलेल्या सुला विनियार्ड्सतर्फे या हंगामात नऊ हजार टन द्राक्षांवर प्रक्रिया करण्यात आली असून त्यापासून वाइन निर्मिती करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रक्रियेचे हे प्रमाण ५० टक्क्य़ांनी अधिक आहे. महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये ५१० शेतकऱ्यांशी करार पद्धतीने शेती केली आहे. या वर्षांत अतिरिक्त ३४० एकरमध्ये नव्याने लागवड केली जाणार असून या माध्यमातून सुलाचे द्राक्ष लागवडीचे क्षेत्र तीन हजार एकरवर पोहचणार आहे.

पोषक वातावरणामुळे यंदा वाइन द्राक्षांच्या उत्पादनात वाढ झाली. या वर्षी मोठय़ा प्रमाणात द्राक्षांवर प्रक्रिया झाल्याने सुलातर्फे गेल्या वर्षीचा जगभरात एक मिलियन वाइन केस विक्रीचा विक्रमही यंदा मोडीस निघणार आहे. या संदर्भात सुलाचे (परिचालन) विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष करण वासानी यांनी माहिती दिली.

वाइन द्राक्षांवर प्रक्रिया करताना विविधतेचा विचार केला गेला. बहुतांश द्राक्षांवर नाशिक आणि दक्षिण महाराष्ट्रासह कर्नाटक येथेही प्रक्रिया करण्यात आली. यंदाचा हंगाम द्राक्ष लागवडीसाठी पोषक राहिला. वातावरणातील बदलामुळे छाटणीला उशिराने म्हणजे डिसेंबरच्या मध्यावर सुरुवात झाली. छाटणीचा हंगाम एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत चालला. आम्ही बियांपासून पापुद्रा योग्य रीतीने वापरून घेतो. द्राक्षांवर प्रक्रिया केल्यानंतर बियांपासून तेल अर्थात ‘ग्रेप सीड ऑइल’ तयार केले जाते. उर्वरित चोथा खत निर्मितीसाठी वापरला जातो, असे सुलाचे प्रमुख राजीव सामंत यांनी सांगितले.

सुला महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे वाइन द्राक्षांची लागवड करीत असून गेल्या वर्षी ३६० एकरमध्ये लागवड केली होती. यंदा आणखी ३४० एकरमध्ये लागवड केली जाणार आहे. या माध्यमातून सुलाचे वाइन द्राक्ष लागवडीचे क्षेत्र तीन हजार एकरपर्यंत पोहचणार आहे.  सद्य:स्थितीत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जवळपास ५१० शेतकरी करार पद्धतीने शेतीद्वारे सुलाशी जोडले गेले आहेत. त्यांना निश्चित हमी भाव मिळतो, असे सुलाने म्हटले आहे.