25 March 2019

News Flash

सुंदर नारायण मंदिर जीर्णोद्धाराचे काम संथपणे

पुरातन वास्तू असलेल्या येथील सुंदर नारायण मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने सुरू आहे.

पुरातन वास्तू असलेल्या येथील सुंदर नारायण मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने सुरू आहे. या कामास सहा महिन्यापेक्षा अधिक दिवस झाल्याने परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शास्त्रीय पद्धतीने काम सुरू असल्याने वर्षभरापेक्षा अधिक वेळ काम सुरू राहणार असल्याचे पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर हे काम काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

मंत्रभूमी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये विशिष्ट बांधकाम शैलीतील अनेक ऐतिहासिक पुरातन मंदिरे आहेत. कालौघात तसेच पर्यावरणातील काही बदलामुळे काही मंदिरांची झीज सुरू झाली आहे. या मंदिरांच्या यादीत पुरातन काळातील अहिल्यादेवी होळकर पुलालगत असलेल्या श्री सुंदर नारायण मंदिराचा समावेश आहे. संपूर्ण काळ्या पाषाणात दगड, चुना, शिसव, नवसागरचा वापर करून हे मंदिर १७५६ साली बांधण्यात आले आहे. सद्यस्थितीत झीज आणि अन्य कारणाने धोकादायक स्थितीत पोहचल्याने पुरातत्त्व विभागाच्या वतीने मंदिराच्या जीर्णोद्धार कामास सुरुवात झाली. त्यासाठी केंद्र सरकारकडून १२ कोटीहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आला असून सहा महिन्यापूर्वी प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. जवळील एका इमारतीत सुंदर नारायण मंदिरातील मूर्तीचे स्थलांतरण करण्यात आले आहे.

या कामासाठी पुरातत्त्व विभागास तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. यातील सहा महिन्याहून अधिक कालावधी झाला असला तरी प्रत्यक्षात कामाची स्थिती ‘जैसे थे’ आहे. पुरातत्त्व विभागाला अडथळ्यांची शर्यत पार करत काम करावे लागत आहे. सुरुवातीला प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली, तेव्हा या ठिकाणी विद्युत वितरणच्या रोहित्रामुळे काम रखडले. नंतरच्या काळात मंदिर बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडावरून काही वाद झाले. काम संथपणे सुरू असल्याने तसेच मंदिराचे बांधकाम साहित्य त्याच आवारात असल्याने परिसरात वाहतूक कोंडी होते. यामुळे काही नागरिकांनी कामास विरोध केला, परंतु पुरातत्त्व विभागाकडून काम कसे सुरू राहील, याची माहिती देण्यात आल्याने नागरिकांचा विरोध काही अंशी मावळला आहे.

सध्या मंदिराचा कळस उतरवूनत्यावर काम सुरू झाले आहे. एक दगड मंदिराच्या रचनेप्रमाणे तयार करण्यासाठी साधारणत सहा दिवसांचा कालावधी लागतो. मंदिराच्या कळसाचे सहा थर पूूर्ण झाले असून त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने विशिष्ट आवरण टाकण्यात येत असल्याने काम झालेच नाही, असे लोकांना वाटत असल्याचे पुरातत्त्व नाशिक विभागाचे प्रमुख विलास वाहणे यांनी सांगितले. मंदिराचा सज्जा पूर्णपणे नव्याने तयार करायचा आहे. या सर्वाचा परिणाम कामावर होत आहे. काही दिवसांपासून कामगार दिवाळीनिमित्त सुटीवर गावी गेल्याने हे काम थांबले आहे. १५ तारखेनंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. पुढील पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे वाहणे म्हणाले.

कुशल कारागीरांची वानवा

सुंदर नारायण मंदिराची बांधणी पाषाणात आहे. महाराष्ट्रात अशी पाषणातील मंदिरांची संख्या कमी आहे. दक्षिणेकडे अशीच मंदिरे असल्याने या मंदिराच्या बांधकामासाठी कारागीर आणि ठेकेदार दक्षिणेतून आले आहेत. त्यांना या मंदिर बांधकामाचा सराव असल्याने कौशल्यपूर्ण पद्धतीने दगडावर त्यांचा हात सुरू असतो.

 

First Published on November 6, 2018 2:43 am

Web Title: sundar narayan temple