नाशिक : राज्यात अस्तित्वात आलेल्या नव्या सत्तासमीकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागली आणि पाच वर्षांपासून अडचणीत आलेल्या त्यांच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात दोन वर्षे त्यांना कारागृहात जावे लागले होते. त्यांच्या सुटकेसाठी रस्त्यावर उतरणारे समर्थक आता नाशिकमधील भुजबळ फार्म, येवल्यातील विंचूर चौफुलीवर आनंदोत्सव साजरा करीत आहेत.

पाच वर्षांत अनेकांनी भुजबळांची साथ सोडली. वातावरण विरोधात असताना भुजबळांनी येवला मतदारसंघातून सलग चवथ्यांदा विजय मिळविला. अकस्मात सत्तेतदेखील स्थान मिळाले.

मुंबईत नवख्या बाळा नांदगावकर यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर भुजबळांनी पुढील काळात म्हणजे २००४ पासून नाशिक गाठले. दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या येवला मतदारसंघात त्यांनी पाय रोवले. सलग चार वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले; परंतु आधीच्या तीन निवडणुका आणि नुकतीच झालेली निवडणूक यामध्ये फरक आहे. काँग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात महत्त्वाची खाती मिळाल्याने निधी आणून कामे करणे त्यांना शक्य झाले. भव्यदिव्य प्रकल्प उभारणे हे त्यांचे आवडीचे काम. दिल्लीत साकारलेले महाराष्ट्र सदन असो, की नाशिक शहरातून जाणारा साडेपाच किलोमीटरचा उड्डाणपूल, ओझर विमानतळाचे प्रवासी वाहतुकीसाठी नूतनीकरण, गंगापूर धरणावर बोट क्लब अशा अनेक कामांतून तेच लक्षात येते. तेव्हा जिल्ह्य़ातील सत्तास्थानावर राष्ट्रवादी, मुख्यत्वे भुजबळांचे वर्चस्व होते. २०१४ मध्ये सत्ता गमवावी लागल्यानंतर पुढील काळ त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला.

भुजबळ फार्म परिसरात उभारलेल्या आलिशान राजेशाही महालातून कुटुंबाची ऐश्वर्यसंपन्नता तपास यंत्रणेच्या नजरेत आली. महाराष्ट्र सदन बांधकामातील आर्थिक घोळ, बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी त्यांना दोन वर्षे तुरुंगात जावे लागले. मतदारसंघाशी संपर्क तुटला. जामिनावर सुटल्यानंतरची विधानसभा निवडणूक त्यांचे राजकीय भवितव्य निश्चित करणार होती. पक्षातून बंडाचे निशाण फडकले. विरोधकांनी सर्व बाजूंनी घेरले. सत्ताकाळात साथ देणारे अनेक सहकारी दुरावले. नाशिक लोकसभा मतदारसंघात पुतणे समीर भुजबळ यांना पराभव पाहावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोठय़ा भुजबळांचा कस लागला.

मांजरपाडा प्रकल्पाने तारले : मांजरपाडा प्रकल्पाचे मतदारसंघात पोहोचलेले पाणी त्यांना विजयाप्रत नेण्यास महत्त्वाचे ठरले. भुजबळांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर हेदेखील तोच दाखला देतात. ‘‘४० वर्षांपासून बंद असणाऱ्या कालव्याला पाणी आले. भुजबळ कारागृहात असताना मतदारसंघातील कामांसाठी पत्रांद्वारे त्यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यांचे स्वीय साहाय्यक आणि आम्ही आमदारकीचा निधी परत जाऊ दिला नाही. भुजबळ मतदारसंघात नाहीत म्हणून काम बंद पडले नाही. आता मंत्रिपद मिळाल्याने डोंगरगावपर्यंत पाणी नेता येईल. जिल्ह्य़ातील रखडलेल्या कामांना गती मिळेल,’’ असे बनकर सांगतात.