विविध शिक्षणक्रमांत इतर मागासवर्ग प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना स्वतंत्र आरक्षण असूनही ते सर्वसाधारण गटातून प्रवेश मिळवितात. यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या गटात प्रवेश मिळणे अवघड झाल्याचा प्रश्न काहींनी मांडल्यानंतर युवा वर्गाशी उत्स्फूर्तपणे संवाद साधणाऱ्या राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांना क्षणभर शांत व्हावे लागले. या विषयाचे गांभीर्य विद्यार्थ्यांच्या ध्यानीमनी नसले तरी सुळे यांना ज्ञात होते. यामुळे त्यांनी संवेदनशील मुद्दय़ावर काहीही भाष्य केले नाही. त्या संदर्भात काही आकडेवारी आहे का.. त्याचा अभ्यास करावा लागेल.. असे सांगत त्यांनी पुढील प्रश्नाकडे मोर्चा वळविला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने सध्या राज्यभरात ‘युवा जागर संवाद’ कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी सकाळी येथील बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी सुळे यांनी संवाद साधला. जवळपास तासभर उत्साहपूर्ण वातावरणात ही चर्चा रंगली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या नवीन संकल्पना अन् विचारांना उत्स्फूर्त दाद देत त्यांनी शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले, परंतु सर्वसाधारण गटातील प्रवेशाच्या मुद्दय़ावर मात्र त्या फारसे बोलल्या नाहीत. सर्वसाधारण गटात प्रवेश मिळविण्यातील अडचणी विद्यार्थ्यांनी मांडल्या. इतर मागास प्रवर्गासाठी स्वतंत्रपणे आरक्षण आहे. असे असताना त्या प्रवर्गातील विद्यार्थी सर्वसाधारण वर्गातून प्रवेश घेतात. यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली. परंतु चर्चेतून तो विषय अलगद बाजूला ठेवला गेल्याने प्रश्नकर्ता अन् त्या अनुषंगाने उपप्रश्न उपस्थित करणारे विद्यार्थी बुचकळ्यात पडले. हा अपवाद वगळता अन्य प्रश्न, समस्यांवर सुळे भरभरून बोलल्याचे पाहावयास मिळाले. ग्रामीण भागातील मुली शाळेत न जाण्यामागे ‘सॅनेटरी नॅपकिन’ची अनुपलब्धता हे महत्त्वाचे कारण असल्याकडे एका विद्यार्थ्यांने लक्ष वेधले. शहरांतील शाळा-महाविद्यालयात मुलींसाठी तशी सुविधा उपलब्ध होते. पण, ग्रामीण भाग त्यापासून दूर राहिल्याची बाब त्याने मांडली. युवतींचे प्रश्न युवक मांडत असल्याबद्दल कौतुक करत त्यांनी प्रश्नकर्त्यांस ‘संवेदनशील विद्यार्थी’ म्हणून प्रशस्तीपत्रक दिले.

एका विद्यार्थिनीने शैक्षणिक संस्थांकडून प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या देणगीचा मुद्दा मांडला. ही रक्कम मोजल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. त्यावर सुळे यांनी शिक्षण संस्थेने देणगी घेणे नियमबाह्य़ असल्याचे स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्य़ात विद्यार्थी व पालकांकडून कोणी देणगी मागत असल्यास संबंधितांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. भारताच्या लोकसंख्येचा विचार करता ऑलिम्पिकसह आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात मिळणारे यश अतिशय त्रोटक असते.

गुणवत्तेला प्राधान्य मिळत नसल्याचे सांगत एका विद्यार्थिनीने धनुर्विद्येची आवड असूनही भरमसाट शुल्कामुळे क्षमता असूनही त्याचे शिक्षण घेता आले नसल्याची व्यथा मांडली. ज्यांच्यात क्षमता आहे, त्यांच्यासाठी सरकारने खास योजना राबविल्यास क्रीडा क्षेत्रात अनेक प्रतिभावान खेळाडू तयार होतील, ही विद्यार्थिनीची सूचना चांगली असल्याचे सुळे यांनी नमूद केले. शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या स्थानिक विद्यार्थ्यांना औद्योगिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांअभावी रोजगाराची संधी मिळत नाही.

रोजगार निर्मितीची नाशिकची क्षमता अतिशय कमी असून ती वाढविण्यासाठी बडय़ा उद्योगांकडून या भागात गुंतवणूक होणे आवश्यक असल्याचा मुद्दा एका विद्यार्थिनीने मांडला. त्याचे सुळे यांनी स्वागत केले.

नव्या युवा धोरणाची तयारी

युवा वर्गाशी अतिशय मनमोकळी चर्चा झाली. स्वामित्व हक्क कायद्याविषयी त्यांच्याकडे ज्ञान आहे. अतिशय नावीन्यपूर्ण व विविधांगी मुद्दे विद्यार्थ्यांनी मांडले. स्वामित्व हक्क कायद्यातील बदलासह अनेक मुद्दय़ांवर त्यांनी अतिशय उत्तम सूचना केल्या. नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत महाराष्ट्राचे नवीन युवा धोरण तयार केले जात आहे. आठ वर्षांपूर्वी प्रतिष्ठानने असे धोरण तयार केले होते. आठ वर्षांत अनेक बदल घडले. त्या अनुषंगाने महाराष्ट्राने चांगले युवा धोरण देशाला द्यावे असा मानस आहे. शेतकरी आत्महत्या, वाहतूक व रोजगाराशी निगडित विषय, सामाजिक प्रश्न, शिक्षण व्यवस्थेतील अडचणी अशा विविध प्रश्नांवर विद्यार्थी चर्चा करीत आहे.  – खा. सुप्रिया सुळे</strong>