‘नाशिप्रमं’चा सूर्यनमस्कारांचा विक्रम      

सूर्य हा ऊर्जेचा स्रोत असल्याने उत्तम शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित सूर्यनमस्कार घालणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासात सूर्यनमस्कार महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असल्याचे मत पालक मंत्री गिरीश महाजन यांनी मांडले आहे.

येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शतक महोत्सवाचे औचित्य साधत  मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे बुधवारी ‘सूर्यनमस्कार एक आविष्कार’ उपक्रमाच्या समारोप प्रसंगी महाजन यांनी मार्गदर्शन केले. बलशाली भारताच्या निर्मितीत तरुणांचे योगदान महत्त्वाचे आहे. नवी पिढी व्यसनमुक्त आणि सुदृढ असणे गरजेचे आहे. सूर्यनमस्कारामुळे संस्कार आणि सर्वागिण व्यायामाचा सुंदर समन्वय होत असल्याने सुदृढ तरुण घडविण्यासाठी सूर्यनमस्कार दररोज न चुकता करावे. परदेशातील नागरिकांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व ओळखले असून ते मोठय़ा प्रमाणात याकडे वळले आहेत. देशातील युवकांनी सूर्यनमस्कार जागतिक पातळीवर नेण्याचे प्रयत्न करतांना देशातही हा व्यायाम प्रकार अधिक घट्टपणे रुजेल याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन महाजन यांनी केले. योगगुरू डॉ. ओमानंद गुरुजी यांनी सूर्य बल, शक्ती, तेज, ओज, शौर्य, बुद्धी आणि जीवन असल्याचे सांगितले.

सूर्याशिवाय सृष्टीची कल्पना शक्य नाही. विद्यार्थ्यांनी जीवनातील उद्दिष्ट गाठण्यासाठी नियमित सूर्यनमस्कार करावे, असा सल्ला त्यांनी दिला. या उपक्रमाची नोंद विश्वविक्रमात करण्यात आली आहे. कार्यक्रमाला महापौर रंजना भानसी, योगगुरू डॉ. ओमानंद गुरुजी, आ. बाळासाहेब सानप, आ. सीमा हिरे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन, संस्थेचे अध्यक्ष विजय काकतकर, कार्याध्यक्ष महेश दाबक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने एक कोटी ४५ लाख ९५ हजार ७८६ सूर्यनमस्कार घालण्याच्या विक्रमाची नोंद ‘वर्ल्ड अ‍ॅमेझिंग रेकॉर्ड’ आणि ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये करण्यात आली. विक्रमाच्या प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऑस्ट्रेलिया, इटली, जपान, दक्षिण आफ्रिका यासह ११ देशांचे १३ प्रतिनिधी कार्यक्रमास उपस्थित होते. डॉ. प्राची सराफ यांनी सूत्रसंचालन केले. प्रद्युमन जोशी यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांच्या मदतीने दोन जागतिक विक्रम

सूर्यनमस्कार उपक्रमाचा आरंभ २०१७ मध्ये रथसप्तमीच्या दिवशी करण्यात आला.

संस्थेच्या नाशिक, इगतपुरी, सिन्नरसह अन्य संकुलातील विद्यार्थ्यांच्या मदतीने वेगवेगळ्या दिवशी विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार केले. बुधवारी मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात या संकल्पनेला मूर्त रूप देत विद्यार्थ्यांनी एक कोटी सूर्यनमस्काराचा पल्ला पार केला.

वर्ल्ड अ‍ॅमेझिंग रेकॉर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन सोलंकी, महाराष्ट्र प्रमुख दिनेश पैठणकर, वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे डॉ. सुवर्णा आणि नरेंद्र बिंगी उपस्थित होते.

संस्थेने विश्वविक्रम केल्याने दोन्ही संस्थांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. काकतकर आणि कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक यांना प्रमाणपत्र व सुवर्ण पदक देऊन गौरविले.