भाजप महिला आघाडीतर्फे १९९६ मध्ये आयोजित महिला अधिवेशन आणि २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सुषमा स्वराज यांचे नाशिकमध्ये आगमन झाले होते. या भेटीदरम्यान स्वराज यांचे अमोघ वक्तृत्व, अभ्यासू वृत्ती, मनमिळावू स्वभावाची अनुभूती स्थानिक पदाधिकाऱ्यांना आली होती. स्वराज यांच्याशी प्रत्यक्ष भेटीचा योग आलेल्या आमदार, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

स्वराज यांचे दोन वेळा नाशिकला येणे झाले होते. महिला संमेलन आणि विधानसभा निवडणुकीची प्रचारसभा. २००४ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार दिवंगत डॉ. डी. एस. आहेर यांच्या प्रचारसभेसाठी त्या आल्या होत्या. तेव्हा महापालिकेत नगरसेविका आणि सध्या भाजपच्या आमदार असलेल्या सीमा हिरे यांच्या गंगापूर रस्त्यावरील तिरुपती टाऊनमधील निवासस्थानी स्वराज यांनी भोजन केले होते. मेथीची भाजी आणि

भाकरी त्यांनी आवडीने खाल्ली. सीमा हिरे यांचे स्वत:च्या मुलीप्रमाणे कौतुक केले होते. सुंदर जेवण तयार केल्याबद्दल उत्स्फूर्त दादही दिली होती, अशी आठवण महेश हिरे यांनी कथन केली. त्या वेळी लक्ष्मण सावजी, निशिगंधा मोगल, विजय साने यांच्यासह दिवंगत नेते पोपटराव हिरे आणि बंडोपंत जोशी उपस्थित होते. तासाभराच्या भेटीत मातृतुल्य व्यक्तिमत्त्वाची प्रचीती आली. त्यांच्या निधनाने मातृछत्र हरपल्यासारखे झाल्याची भावना आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केली.

स्वराज यांची ओघवती वाणी, मुद्देसूदपणे मांडणी याची अनुभूती भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनीदेखील घेतली. महिला आघाडीच्या संमेलनात पहिल्यांदा त्यांना भेटण्याची संधी मिळाली. स्वराज यांना भेटताना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. महिलांनी स्वत:ची क्षमता ओळखून विश्वासाने पुढे जायला हवे, असा सल्ला दिला होता. राजकारणात आमच्यासारख्या अनेकींच्या त्या आदर्श आहेत.  विधानसभा निवडणुकीत त्यांची नाशिक येथे जाहीर सभा होती. त्या वेळी आपणच पुष्पहार घालून स्वराज यांचे स्वागत केले होते. प्रत्येकाशी त्या आपुलकीने संवाद साधायच्या, अशी आठवण फरांदे यांनी सांगितली.

भाजपच्या उच्चपदस्थ नेत्या, उत्तम वक्त्या असणाऱ्या स्वराज यांच्याविषयी कार्यकर्त्यांना प्रचंड कुतूहल होते. त्या नाशिकमध्ये आल्या असताना त्या वेळी भाजपच्या महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद निशिगंधा मोगल यांच्याकडे होते. महिला आघाडीने महिलांच्या हक्काची सनद तयार केली होती. त्याचे प्रकाशन स्वराज यांच्या हस्ते पुण्यात झाल्याची आठवण भाजपचे प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी यांनी सांगितली.