07 August 2020

News Flash

रुग्णवाहिकेतून उडी मारल्याने संशयित करोना रुग्णाचा मृत्यू

रुग्णवाहिका सुरू होताच संशयित रुग्णाने दरवाजा उघडून पळ काढला.

नाशिक : करोनाबाधिताच्या संपर्कातील एका व्यक्तीला शहरातील नासर्डी पुलालगतच्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. रुग्णवाहिकेतून त्याला महापालिकेच्या अथवा खासगी रुग्णालयात नेले जाणार असतांना संबंधिताने दरवाजा उघडून पळ काढला. आपल्या मोटारसायकलवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात हृदयविकाराच्या धक्क्य़ाने तो कोसळला. त्यास तातडीने डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या संशयित रुग्णाचा भीतीपोटी मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील वडाळा नाका येथील ५५ वर्षीय व्यक्तीला समाज कल्याण विभागाच्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. चार जुलै रोजी त्यास भरती करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्याचे तपासणी नमुने घेतले जाणार होते. या रुग्णास कुठलाही त्रास नव्हता. परंतु, त्याने खासगी रुग्णालयात जाण्याचा आग्रह धरला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला वेगवेगळे पर्याय दिले. परंतु, त्यांनी ते नाकारले. अखेर त्यास डॉ. जाकीर हुसेन अथवा त्याच्या आवडीच्या रुग्णालयात पाठविण्यासाठी रुग्णवाहिकेत बसविण्यात आले. रुग्णवाहिका सुरू होताच संशयित रुग्णाने दरवाजा उघडून पळ काढला. त्याचवेळी संबंधितास हृदयविकाराचा धक्का येऊन तो खाली कोसळला.

करोनाची भीती बाळगू नका

वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून अहोरात्र रुग्णांसाठी काम करत आहे. परंतु, संशयित रुग्ण वा बाधित रुग्णाचा केवळ भीती अथवा घबराटीपोटी मृत्यू होणे ही बाब दुर्देवी आहे. कुणीही करोनाची भीती बाळगू नये, मात्र नियमांचे पालन करावे. करोना संशयित अथवा बाधित असले तरी घाबरण्याचे कारण नाही. करोना हा आजार बरा होतो. आजपर्यंत मृत पावलेल्या व्यक्तींच्या निरीक्षणात भीतीपोटी मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

– डॉ. राजेंद्र त्र्यंबके (आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 3:26 am

Web Title: suspected corona patient dies after jumping out of ambulance zws 70
Next Stories
1 करोनाविरोधातील नियमांचे पालन करायला सांगून सोनसाखळी लंपास
2 शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
3 नादुरुस्त रोहित्रांमुळे ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई
Just Now!
X