News Flash

कायाकल्प अभियानात कळवण उपजिल्हा रुग्णालयाची सरशी

सरकारी रुग्णालयांची जनमानसातील प्रतिमा बदलविण्याच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकले आहे.

 

सरकारी रुग्णालयाची दुरवस्था सर्वश्रुत असताना पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत आरोग्य संस्थांसाठी राबविण्यात आलेल्या कायाकल्प अभियानात आदिवासी भागातील कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे रुपडे बदलले आहे. अभियानात या रुग्णालयाने राज्यात पहिला क्रमांक पटकावत सरकारी रुग्णालयांची जनमानसातील प्रतिमा बदलविण्याच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकले आहे.

स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण देशात स्वच्छतेबाबत जागृती होत असताना त्यासाठी वेगवेगळे उपक्रम व स्पर्धाचे आयोजन शासकीय पातळीवर करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून आरोग्य विभागाने सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये आमूलाग्र बदल घडवून नागरिकांना विविध सुविधा व स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यासाठी ‘कायाकल्प अभियान’ची आखणी केली. राज्यस्तरावर ५०० आरोग्य संस्थांनी त्यात सहभाग नोंदविला. नाशिक जिल्ह्य़ातील दहा संस्थांचा त्यात समावेश होता. सर्व पातळीवर अग्रेसर असणाऱ्या कळवण उपजिल्हा रुग्णालयाने अभियानात प्रथम क्रमांक प्राप्त केला.

रुग्णालयास हे यश सहजासहजी मिळालेले नाही. उपजिल्हा रुग्णालयातील निसर्गरम्य वातावरण आणि विविध सुविधा तसेच स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न यामुळे रुग्णालयाने अल्पावधीत राज्यपातळीवर नावलौकिक प्राप्त केला. यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुलाबराव सोनवणे, कायाकल्प अभियानाचे जिल्हा अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. प्रशांत खैरे, डॉ. नीलेश लाड, डॉ. पराग पगार आदींचे सहकार्य लाभले. अभियानात सहभागी होतानाच त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे संबंधितांनी निश्चित केले. रुग्णालयातील निसर्गरम्य वातावरण लक्षात घेऊन आवारात गांडूळखत प्रकल्प सुरू करण्यात आला. असा प्रकल्प सुरू करणारे हे राज्यातील पहिलेच रुग्णालय ठरले. या खताचा उपयोग परिसरातील झाडांसाठी केला जातो. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’द्वारे पावसाचे पाणी साठवले जाते. द्रव कचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत नाशिकच्या कंपनीशी करार करण्यात आला. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णालयात दिशादर्शक व आरोग्यविषयक माहिती फलक ठिकठिकाणी लावण्यात आले. लोकसहभागातून जुन्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. तसेच त्या ठिकाणी आयुर्वेदिक अशा ‘आयुष’ उद्यानाची निर्मिती करण्यात आली. त्या ठिकाणी प्रत्येक झाडाची माहिती सांगणारे फलक साऱ्यांचे लक्ष वेधतात. उपजिल्हा रुग्णालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा, उपलब्ध सुविधा यांची माहिती देण्याकरिता रुग्णालयाने स्वत:चे संकेतस्थळ तयार केले आहे. रुग्णालयाच्या अशा अनोख्या उपक्रमांची दखल घेऊन राज्यस्तरावर निवड झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या पाश्र्वभूमीवर

वर्धा येथील डॉ. वाघमारे, औरंगाबाद येथील डॉ. आर. एन. देशमुख, अमरावती येथील डॉ. आसोले हे केंद्रीय समितीच्या तज्ज्ञांची समिती रुग्णालयास भेट देणार आहे.

सारे काही रुग्णसेवेसाठी

कायाकल्प अभियानाच्या माध्यमातून रुग्णालयात झालेले आमूलाग्र बदल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी लाभदायक आहेत. पुढील काळात अंतर्गत व बाह्य़ स्वच्छतेसोबत आल्हाददायक वातावरणात रुग्णांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू राहतील.

–  डॉ. गुलाबराव सोनवणे (वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय कळवण)

 

सामूहिक प्रयत्नांचे यश

कायाकल्प अभियानात राज्यात पहिल्या ५० संस्थांमध्ये नाशिक जिल्ह्य़ातील पाच संस्थांचा समावेश आहे. कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयाने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त  केला. सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांच्या प्रयत्नांनी हे यश प्राप्त झाले.

–  डॉ. अनंत पवार  (जिल्हा नोडल अधिकारी, कायाकल्प अभियान)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 1:59 am

Web Title: swachh bharat abhiyan in kalwan sub district hospital
Next Stories
1 राजकारणाची ‘सावाना’स लागण
2 दिवाळीत बस प्रवास महाग ठरणार
3 नाशिकच्या महिला बचत गटांचं ‘पुढचं पाऊल’
Just Now!
X