News Flash

स्वच्छतेसाठी त्र्यंबकमध्ये ‘निर्मल वारी’ अभियान

अमृता फडणवीस यांच्याकडून प्रबोधन

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

११ ते १३ जानेवारी कालावधीत आयोजन; अमृता फडणवीस यांच्याकडून प्रबोधन

जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात ११ ते १३ जानेवारी या कालावधीत त्र्यंबक येथे होणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र प्रांतने ‘निर्मल वारी’ची साद घातली असून त्या अनुंषगाने कामे अंतिम टप्प्यात आहे. या उपक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या पालखी सोहळ्यास उपस्थित राहून सार्वजनिक स्वच्छतेविषयी प्रबोधन करणार आहेत.

त्र्यंबकेश्वर येथे पौष महिन्यातील एकादशीला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा वारी सोहळा रंगतो. या सोहळ्यास राज्यातील विविध भागातून ३५० हून अधिक लहान-मोठय़ा दिंडय़ा सहभागी होतात. वारीनिमित्त त्र्यंबकमध्ये तीन ते चार लाख वारकरी दाखल होत असल्याने त्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतेचा मुद्दा गंभीर बनतो. या पाश्र्वभूमीवर, वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने ‘निर्मल वारी’ अभियान हाती घेण्यात आले. वारी काळात त्र्यंबकनगरीत १२०० फिरत्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

परिसर स्वच्छतेची जबाबदारी आश्रमने घेतली आहे. ११ जानेवारीला त्र्यंबक नगरीत वारकरी येण्यास सुरूवात होईल. त्या अनुषंगाने शहरातील ज्या ज्या भागातून दिंडी मार्गस्थ होईल, त्या ठिकाणी स्वयंसेवक आणि स्थानिक नगरसेवक वारकऱ्यांना स्वच्छता राखण्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी २८०० स्वयंसेवकांना कचऱ्याचे वर्गीकरण, स्वच्छता कशी राखावी, वारकऱ्यांचे सार्वजनिक स्वच्छेतासाठी करण्यात येणारे प्रबोधन आदींबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या स्वयंसेवकांची मदत उपक्रमात घेण्यात येणार आहे.

या काळात त्र्यंबकेश्वरमध्ये प्लास्टिक बंदी असून वारी काळात नाशिक ते त्र्यंबक दरम्यान तयार होणारा कचरा संकलित करण्यासाठी वेगवेगळ्या पिशव्या तसेच रिकामी खोकी देण्यात येतील. वारकरी कचरा गोळा करताय की नाही, याची जबाबदारी स्वयंसेवकांसह दिंडी प्रमुखांकडे राहील.

त्र्यंबक येथे सार्वजनिक स्वच्छता- आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयागतीर्थ, पावन गणपती, काश्मी आश्रम, जुना उदासीन आखाडा, नवीन उदासीन आखाडा, ब्रम्ह पवित्र पठार, नील पर्वत पायथा, म्हाळसा देवी मंदिर, बिल्वतीर्थ परिसरात सार्वजनिक फिरते स्वच्छता गृह ठेवण्यात येणार आहे. या स्वच्छता गृहांचा वापर करावा, असे आवाहन वेळोवेळी करण्यात येईल. या काळात कचऱ्याचे वर्गीकरण वारकरी तसेच स्वयंसेवकांकडून होईल. संकलित झालेला कचरा त्र्यंबक नगर पालिकेच्या सहकार्याने उचलण्यात येणार आहे.

निर्मल वारीच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य अशा विविध विषयांवर समित्या गठित करण्यात आल्या असून त्र्यंबकमध्ये नियोजनार्थ वनवासी कल्याण आश्रमने खास ‘वॉर रूम’ तयार केली आहे. साधू-महंताचे स्वागत, वारकऱ्यांना आपत्कालीन सेवा सुविधा यासह अन्य व्यवस्था करण्यात आली आहे. वारी यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी, त्र्यंबक नगर पालिका अधिकारी यांच्यासमवेत नियमित बैठका सुरू आहेत.    – अ‍ॅड. मीनल वाघ-भोसले ,  प्रसिद्धी प्रमुख, निर्मल वारी अभियान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2018 1:25 am

Web Title: swachh bharat abhiyan in nashik 2
Next Stories
1 रहिवासी इमारतींमध्ये अवैध खाद्यपदार्थ व्यवसाय
2 नाशिक जिल्हा बँक, बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त
3 थंडीत ‘थर्टी फर्स्ट’चा अनोखा उत्साह
Just Now!
X