सत्ताधाऱ्यांसह तीन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामासाठी कंबर कसली

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले नाशिक शहर स्वच्छतेच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे, याकरिता सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. स्वच्छतेसाठीच्या लगीनघाईत सत्ताधारी तसेच आरोग्य, बांधकाम यासह अन्य विभागातील अडीच ते तीन हजार कर्मचारी अक्षरश: कामाला लागले आहेत. तथापि, सर्वेक्षणात महत्त्वाचा ठरणारा शहरवासीयांचा प्रतिसाद अगदीच तोळामासा असल्याचे चित्र आहे.

स्वच्छ भारत अभियानात नाशिक शहर पिछाडीवर राहू नये याकरिता पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेची धुरा सांभाळणाऱ्यांना वारंवार सूचना दिल्या. शहरातील एकंदर स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती २० ते २३ जानेवारी या कालावधीत सर्वेक्षण करणार असल्याचा अंदाज आहे. समितीच्या दौऱ्याला काही दिवसांचा अवधी राहिल्याने महापौर, उपमहापौर आदींनी भाजपसह सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सोबतीने नाशिकचा चेहरामोहरा बदलण्याची धडपड चालवली आहे.

खुद्द महापौर वेगवेगळ्या भागात भेट देऊन स्वच्छतेची पाहणी करीत आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांवर प्रसंगी कारवाईचा बडगा उगारला जात आहे.  शुक्रवारी महापौर रंजना भानसी, सभागृह नेते दिनकर पाटील, स्थायी सभापती शिवाजी गांगुर्डे, आरोग्य-वैद्यकीय सभापती सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजप नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी उद्यान, सीबीएस बस स्थानक, महात्मा गांधी रोड, फुले मार्केट, शिवाजी रोड, शरणपूर रस्ता आदी ठिकाणांची पाहणी केली. त्यावेळी ठिकठिकाणी पडलेल्या कचऱ्याचे दर्शन त्यांना घडले. परिसरातील आरोग्यविषयक समस्या, रस्ते, वीज, गटार, बांधकाम आदी विषयांवरील समस्या जाणून घेतल्या. विभागीय अधिकाऱ्यांना नियमित स्वच्छतेसह आदी समस्यांचे तातडीने निवारण करण्याची सूचना दिली. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, नगरसेविका हिमगौरी आहेर, स्वाती भामरे आदी उपस्थित होते.

शहराला स्वच्छ करण्यासाठी भाजप प्रयत्नरत असला तरी समितीच्या दौऱ्यासाठी खरेदी केलेल्या कचरा पेटय़ांवर शिवसेनेने आधीच आक्षेप नोंदविला आहे. अतिशय कमी क्षमतेच्या कचरा पेटी कचऱ्याने ओसंडून वाहतात. या पेटय़ा ठेवलेली ठिकाणे कचरा कुंडी बनल्याचे दृष्टिपथास पडते. या सर्वेक्षणात लोकसहभाग महत्त्वाचा भाग आहे. सद्यस्थिती पाहिल्यास पालिकेची यंत्रणा या कामात गुंतली आहे. अपवादाने काही ठिकाणी स्थानिक नागरिक सहभागी होताना दिसतात. सत्ताधारी भाजपने स्वच्छतेचे हे काम कायमस्वरुपी केले जाणार असल्याचे म्हटले आहे.

समितीच्या दौऱ्यातील ठिकाणांची प्रामुख्याने स्वच्छता

केंद्रीय समिती ज्या भागाचा मुख्यत्वे दौरा करेल, अशी ठिकाणे हेरून त्याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. ती ठिकाणे स्वच्छ करण्याकडे प्राधान्य दिले जात आहे.  त्या अंतर्गत प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांमधील कचरा संकलित केला जातो. शिवाय, दुभाजकांची टँकरने पाणी आणून स्वच्छता केली जात आहे. समितीच्या दौऱ्यामुळे रस्ते दुभाजक, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, घंटागाडीमार्फत कचरा संकलन, कचरा वेचण्यासाठी खास मोहीम असे अनेक उपक्रम एकाचवेळी हाती घेण्यात आले आहेत.  केंद्रीय समितीच्या पाहणी दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर, दैनंदिन संकलित होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. गतवर्षी शहरातून दिवसाला साडे तीनशे टन कचरा संकलन झाले होते. आज हेच प्रमाण साडे चारशे ते पाचशे टनापर्यंत पोहोचले आहे.