• सात महिन्यांत ४२ जणांचा मृत्यू
  • नाशिकमधील १३ रुग्णांचा समावेश
  • आतापर्यंत ६० हजार रुग्णांची तपासणी

मागील सात महिन्यांत जिल्ह्य़ात स्वाइन फ्लू आजाराने ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी केवळ चार रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला होता. यंदा हे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. शहरी व निमशहरी त्यातही गर्दीच्या ठिकाणी रुग्णांची संख्या अधिक तर आदिवासी भागात ती कमी आहे. आजाराच्या प्रतिबंधाबाबत प्रभावी उपाय योजना करावी, असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा आरोग्य समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी साथजन्य रोग प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस खा. हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, आ. बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते. डॉ. जगदाळे यांनी जिल्ह्यातील स्वाइन फ्लूची स्थिती कथन केली.

या वर्षी सात महिन्यात स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात नाशिक महापालिका हद्दीतील १३ आणि जिल्ह्याबाहेरील आठ रुग्णांचा समावेश आहे. निफाड तालुक्यात पाच, सिन्नर, नाशिक तालुका प्रत्येकी तीन, देवळा, चांदवड, मालेगाव महापालिका क्षेत्रात प्रत्येकी दोन तर दिंडोरी तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, देवळा, नांदगाव, येवला अशा एकूण सात तालुक्यात या आजाराने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाने सात महिन्यात ६० हजार रुग्णांची तपासणी केली. त्यात संशयित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात आले. बहुतांश रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचे डॉ. जगदाळे यांनी नमूद केले. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये सध्या २० हजार टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा साठा शिल्लक आहे. खासगी रुग्णालयांना स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करता येतो. सध्या शासकीय रुग्णालयांमध्ये चार रुग्ण दाखल आहेत.

ही आकडेवारी समोर आल्यावर स्वाइन फ्लू आणि डेंग्यूबाबत प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश महाजन यांनी दिले. प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृतीवर लक्ष देणे आवश्यक आहे.

मालेगाव सामान्य रुग्णालयात अधिक चांगल्या सुविधा देण्याबाबत विशेष लक्ष देण्याच्या आणि स्वाइन फ्लूच्या उपचारासाठी टॅमी फ्लूच्या गोळ्या सर्व रुग्णालयात पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. डॉ. जगदाळे यांनी स्वाइन फ्लूबाबत करण्यात येणाऱ्या उपायांची माहिती दिली. आरोग्य यंत्रणेमार्फत जनजागृतीवर भर देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. डॉ. वाकचौरे यांनी साथजन्य रोगाबाबत माहिती दिली.

स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा

गर्दी असणाऱ्या भागात या रोगाचा प्रादुर्भाव अधिक तर कमी गर्दी असणाऱ्या भागात कमी असल्याचे दिसून येते. २०१५ वर्षांत जिल्ह्यात एकूण ८७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०१६ वर्षांत हे प्रमाण चारवर आले. यंदा मात्र त्यात पुन्हा वाढ झाली आहे. या वर्षी सात महिन्यात स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी उन्हाळ्यातील दोन महिन्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या अकस्मात वाढली होती. तरीही यंदा मात्र स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला.