नाशिक : जिल्ह्य़ात रात्री तसेच पहाटे असणारा गारवा आणि दिवसभर असणारा उकाडा अशा विचित्र वातावरणामुळे स्वाइन फ्लुसदृश आजाराचा धोका वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्य़ात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा शासकीय रुग्णालयासह महापालिका रुग्णालयात ३२० रुग्णांना स्वाइन फ्लूसदृश्य आजार झाल्याचा अंदाज

प्रथमदर्शनी व्यक्त करण्यात आला आहे. यातील ५२ रुग्णांना स्वाइन फ्लू झाला असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

काही दिवसांपासून रात्री आणि पहाटेच्या सुमारास थंडी पुन्हा जाणवू लागली असताना आता दिवसा उन्हाचा तडाखाही बसू लागला आहे. अशा वातावरणामुळे अनेकांना डोकेदुखी, अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला, घशात खवखवणे असा त्रास होण्यास सुरुवात झाली आहे.

जिल्ह्य़ातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये अशी लक्षणे जाणविणाऱ्या २५ हजार ५१४ रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यापैकी ३२० रुग्णांना स्वाइन फ्लुसदृश आजार असल्याचा अंदाज असून ५२ रुग्णांना स्वाइन फ्लू असल्याचा अहवाल प्राप्त झाला. ५२ रुग्णांपैकी एक रुग्ण जळगाव येथील असून दोन रुग्ण अहमदनगर येथून नाशिक येथे उपचारासाठी आले आहेत. उपचार घेत असतांना तीन रुग्णांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला.

दरम्यान, देशात जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात, राजस्थान या ठिकाणी स्वाइन फ्लूचा कहर वाढला असून महाराष्ट्रातही याचा प्रभाव वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

आरोग्यविभागाचे आवाहन

स्वाइन फ्लू हा हवेमार्फत पसरत असल्याने पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोगाचे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण, चेतासंस्थांचे विकार असणाऱ्या व्यक्ती यांना हा आजार होऊ शकतो. सर्दी, ताप, अशी लक्षणे आढळल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयात उपचार घ्यावे. सर्व रुग्णालयांमध्ये टॅमी फ्लूचा औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.