21 October 2019

News Flash

आदिताल तबला अकादमीतर्फे ‘तबला चिल्ला’

तीन दिवसांत पाच सत्रे होणार  

तीन दिवसांत पाच सत्रे होणार  

शहरातील आदिताल तबला अकादमीच्या वतीने शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथील विशाखा सभागृहात ‘तबला चिल्ला’ कार्यक्रम होणार आहे. यासाठी सिंगल विंडो सव्‍‌र्हिसेस (एस.डब्ल्यू.एस.) आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सहकार्य मिळाले आहे.

सलग पाच सत्रांमध्ये म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी पाच ते नऊ, शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी एक, सायंकाळी पाच ते नऊ, रविवारी सकाळी नऊ ते एक आणि सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता बाल तबलावादक विहंग मुळे, आदितालचा शिष्य रसिक कुलकर्णीचे तबलावादन होणार आहे.

याच सत्रात ज्येष्ठ नादसाधक पंडित शशिकांत मुळ्ये यांच्यावरील प्रल्हाद आवलसकर लिखित ‘गाणारा तबला’ पुस्तकाचे प्रकाशन तबला वादक पंडित नयन घोष यांच्या हस्ते होणार आहे. पुस्तक प्रकाशन समारंभानंतर पंडित मुळ्ये यांच्याशी गायक तसेच समुपदेशक शंतनू गुणे हे संवाद साधणार आहेत. कार्यक्रमास ज्येष्ठ तबलावादक पंडित बापूसाहेब पटवर्धन, पंडित कमलाकर वारे, लोकेश शेवडे, नगरसेवक शाहू खैरे, एस. डब्ल्यू. एस.चे रघुवीर अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी सकाळी नऊ वाजता दीपक कुलकर्णी यांच्या हस्ते सत्राचे उद्घाटन होणार असून मुंबई येथील तबलावादक तनय रेगे यांच्यानंतर आदितालचा अथर्व वारे तबलावादन करेल. इंदूरचे हितेंद्र दीक्षित यांच्या तबलावादनाने सत्राचा शेवट होईल. सायंकाळच्या सत्राचे प्रथमेश अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यानंतर मुंबईचा इशान घोष, यशवंत वैष्णव आपली कला सादर करणार आहे. सत्राचा शेवट बनारस घराण्याचे पंडित अरविंद आझाद यांच्या तबलावादनाने होणार आहे.

रविवारी सकाळी नऊ वाजता सत्राचे उद्घाटन संदीप देशमुख यांच्या हस्ते होणार असून प्रारंभी गुरुकृपा तबला अकादमीचा बल्लाळ चव्हाण, नंतर ठाण्याचे रोहित देव तबलावादन करणार आहेत. लातूरचे

प्राचार्य डॉ. राम बोरगांवकर, गणेश बोरगांवकर यांच्या तबलावादनानंतर खाँसाहेबांचे ज्येष्ठ शिष्य पंडित बापूसाहेब पटवर्धन यांचे वादन होईल. सायंकाळच्या सत्राचे मनीषा अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. आदिताल अकादमीचा दिगंबर सोनवणे, त्यानंतर आग्रा येथून आलेले डॉ. निलू शर्मा यांचे तबलावादन होणार आहे. सत्राचा शेवट पंडित ओंकार गुलवाडी यांच्या तबलावादनाने होईल. कार्यक्रमात पुष्कराज भागवत, ज्ञानेश्वर सोनवणे संवादिनीची साथ करणार आहेत. उस्ताद अहमदजान थिकरवाँ खाँसाहेबांची दोन मिनिटांची ध्वनिमुद्रित फीत ऐकविल्यानंतर तबला चिल्ला कार्यक्रमाचा समारोप होईल. खाँसाहेबांचे ज्येष्ठ शिष्य पंडित नारायण जोशी यांना हा चिल्ला समर्पित केला जाणार आहे.

कार्यक्रम सर्वासाठी खुला असून रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तबला अकादमीच्या विद्यार्थी प्रतिनिधीतर्फे करण्यात आले आहे.

तबला चिल्ला म्हणजे काय?

पूर्वीचे तबलावादक ४० दिवस सलग रोज ठरावीक तास तबल्यामधील एखाद्या रचनेचा सराव करीत असत. एकही दिवस खंड न पडता आणि वेळ कमी न करता ही साधना होत असे. या परंपरेला ‘तबला चिल्ला’ नामकरण पडले. चिल्ला म्हणजे चाळीस. थिरकवाँ खाँसाहेबांनी असा चिल्ला आणि साधना नऊ वर्षे सलग रोज १६ तास याप्रमाणे केली.

First Published on January 8, 2019 12:52 am

Web Title: tabla concert in nashik