येथील पवार तबला अकादमी आणि एसडब्लूएस सोल्यूशन्स यांच्या वतीने १६ आणि १७ डिसेंबर रोजी भानुदास पवार स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात तबलावादन आणि फ्युजनचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. पंडित मुकुंदराज देव आणि सत्यजित तळवलकर या तबलावादकांचे सादरीकरण हे यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्टय़ आहे.

गंगापूर रस्त्यावरील कुर्तकोटी शंकराचार्य न्यास सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता अकादमीचे ज्येष्ठ विद्यार्थी सुजित काळे, गौरव तांबे, कुणाल काळे आणि कल्याण पांडे यांचे तबला सहवादन होईल. त्यांना पुष्कराज भागवत (संवादिनी), साथसंगत करतील. त्यानंतर अद्वय पवार, अथर्व वारे (तबला), नीलेश गाडवे (पखवाज), ओंकार पांडे (ऑक्टोपॅड), ओंकार कोडीलकर (कॅजोन), गौरव तेजाळे (झेंबे), पार्थ शर्मा (गिटार), ईश्वरी दसककर (की बोर्ड), हर्षद वडजे (गायन) हे फ्युजन सादर करतील.

कार्यक्रमाच्या शेवटी ठाणे येथील प्रसिद्ध तबलावादक पं. मुकंदराज देव यांचे एकल तबला वादन होईल. त्यांना प्रशांत महाबळ (संवादिनी) साथसंगत करतील. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता गायक ज्ञानेश्वर कासार आणि मधुरा बेळे संगीत मरतड पंडित जसराज यांची संकल्पना असलेला जुगलबंदी हा अभिनव प्रयोग सादर करतील. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण सत्यजित तळवलकर यांचे एकल तबलावादन हे आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे या सोहळ्यास साहाय्य लाभले आहे. यंदा सामाजिक बांधिलकीच्या नात्याने चार होतकरू विद्यार्थ्यांना सरावासाठी नवीन तबला जोडी अकादमीकडून देण्याचा उपक्रम यावेळी होणार आहे. संगीत सोहळ्यास प्रवेश सर्वाना खुला असून रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन नितीन पवार, भास भामरे आणि रघुवीर अधिकारी यांनी केले आहे.