खर्चासाठी पैसे न दिल्याने जिवे मारण्याचा प्रयत्न

खर्चासाठी पैसे दिले नाही म्हणून तडीपार गुन्हेगाराने वडिलांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वडाळा गावातील जय मल्हार कॉलनी भागात घडली. नंतर या संशयिताने स्वतच्या हातावर ब्लेडचे वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जय मल्हार कॉलनीत सुखवास्तू अपार्टमेंटमध्ये निजामुद्दीन कासमअली शेख (६४) कुटुंबासमवेत राहतात. बुधवारी सायंकाळी उशिरा त्यांचा मुलगा संशयित समीर ऊर्फ सोनू हा घरी आला. त्याने वडिलांकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने त्याने वडील निजामुद्दीन, आई जुबेदा, बहीण साजिया यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वडिलांचा गळा दाबत त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्वतच्या हातावर ब्लेडने वार करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तो जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी निजामुद्दीन यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. समीरनेही वडिलांविरुद्ध तक्रार केली आहे. मध्यरात्री तो घरी आला असता वडिलांनी तू तडीपार आहेस, व्यवस्थित राहा, असे सांगत आपल्यावर कोयत्याने वार केले. त्यावेळी संशयित मुस्तफा आणि गुलामगौस निजामुद्दीन शेख यांनी मारहाण केली, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी समीरवर तडीपारीची कारवाई केली होती. तडीपार गुन्हेगार शहरात राजरोस फिरत असल्याचे काही प्रकार मध्यंतरी उघड झाले होते. तडीपारीच्या काळात समीरही शहरात येत असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले आहे. पोलीस दोन्ही घटनांना तपास करीत आहेत.