एकास अटक; हॉटेलच्या नोकरांमधील वादातून घटना
नाशिकरोड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये बुधवारी रात्री पैशाच्या वादातून दोन नोकरांनी तडीपार गुंडाचा खून करण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी अटक केली.
नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या समोरील बाजूस हॉटेल श्रीकृष्ण आहे. गोरेवाडी भागातील मनीष शांताराम मॉन्टी (३५) हा बुधवारी रात्री साडे नऊ वाजता हॉटेलमध्ये आला होता. मनीषचा काही दिवसांपूर्वी हॉटेलमधील नोकर शिवा वाजपेयी (२०) व गिरीधर दीक्षित (१८) यांच्याशी वाद झाला होता. यावेळी मनीषने पैसे न देताच त्यांच्याकडे खाद्यपदार्थाची मागणी केली. यातून तिघांमध्ये पुन्हा वादास सुरुवात झाली. दोघा नोकरांनी मनीषला हॉटेलच्या पाठीमागे नेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी फरशी त्याच्या डोक्यात टाकली. या प्राणघातक हल्ल्यात मनीष गंभीर जखमी झाला. संशयितांनी तेथून पलायन केले.

दरम्यानच्या काळात जखमी मनीषला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची माहिती हॉटेल मालकाने उशिराने पोलिसांना कळविली. यामुळे संशयित वेटर पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी संशयित दीक्षितला शिताफीने अटक केली. वाजपेयी अद्याप फरार असून दोघांवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मृत मनीष हा तडीपार गुंड आहे. नाशिकरोडसह अन्य पोलीस ठाण्यात त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या कारणास्तव त्याच्यावर तडिपारीची कारवाई करण्यात आली. तडीपार असणारे गुन्हेगार शहरात राजरोसपणे कसे भ्रमंती करतात, यावर या घटनेने प्रकाश टाकला. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या जवळपास तडीपार झालेले गुन्हेगार भ्रमंती करत असताना पोलीस यंत्रणेला मात्र थांगपत्ता नव्हता, हे उघड झाले आहे.