News Flash

चोरटय़ांच्या धक्क्याने शिक्षिका जखमी

पायी जाणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने वा पर्स लंपास करण्याच्या घटना

पायी जाणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने वा पर्स लंपास करण्याच्या घटना अव्याहतपणे घडत असताना चोरटे आता संबंधितांना लक्ष्य करण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे समोर आले आहे. आसारामबापू पुलाजवळ चोरटय़ांनी पर्स खेचताना दिलेल्या धक्क्याने महिला जखमी झाली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उषा विश्वास भानोसे (५७) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. शिशू विहार बालक मंदिर शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे शाळेतील काम आवरून त्या पायी घरी निघाल्या असताना हा प्रकार घडला. सावरकर नगरमधील गणेश मंदिराच्या बाजूने त्या घरी जात असताना पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना धक्का देत पर्स ओढली. अचानक घडलेल्या या घटनेत भानोसे खाली पडल्या. त्यांच्या हाताला दुखापत झाली. चोरटे क्षणार्धात दुचाकीवरून आसारामबापू पुलाकडे पसार झाले. आसपासच्या नागरिकांनी धाव घेईपर्यंत बराच उशीर झाला. पर्समध्ये भ्रमणध्वनी व रोख रक्कम असा दहा हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधारणत: तीन वर्षांपूर्वी गंगापूर रस्त्यावर घडलेल्या अशाच एका घटनेत महिला गंभीर जखमी झाली होती. पतीसमवेत महिला दुचाकीवर जात असताना चोरटय़ांनी मंगळसूत्र खेचले होते. संबंधित महिला दुभाजकावर पडून जखमी झाली. सोन्याचे दागिने, पर्स वा भ्रमणध्वनी खेचून नेण्याचे अगणिक प्रकार घडत आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत या चोरटय़ांना पकडण्यासाठी यंत्रणेमार्फत नाकाबंदी केली जाते. वाहनांची तपासणी केली जाते. मात्र, चोरटे जेरबंद होण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे.
दोन चोरटे जेरबंद
पाथर्डी परिसरात संशयास्पदपणे फिरणाऱ्या दोन चोरटय़ांना अंबड पोलिसांनी अटक केली. संशयितांकडून सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे. महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याच्या घटना वाढत आहेत. या प्रकरणी शहरातील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. पाथर्डी फाटा परिसरात दोघे संशयास्पदपणे फिरत असल्याची खबर मिळाल्यावर अंबड पोलिसांनी कार्यवाही केली. संशयितांकडे चौकशी केली असता एकाने पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पोलिसांनी सलीम इराणी आणि राज इराणी या दोघांना जेरबंद केले. या दोघांवर दिल्ली, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, श्रीरामपूर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे दीड तोळ्याहून अधिक वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र सापडले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात एका महिलेने मंगळसूत्र चोरीस गेल्याची तक्रार दिली होती. त्यात या संशयितांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आल्यावर दोघांना इंदिरानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 8:54 am

Web Title: teacher got injured
टॅग : Robbery
Next Stories
1 नाताळच्या स्वागतासाठी शहरभर उत्साह
2 अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे समाजगौरव पुरस्कार जाहीर
3 देवळाली कॅम्पमधील भूखंडाची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री
Just Now!
X