मुख्यालयात शेकडो शिक्षकांची झुंबड

नाशिक : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने निर्बंध कठोर होण्याच्या दिवशी खुद्द महापालिकेकडून करोनासंबंधीच्या नियमांची पायमल्ली झाली. मध्यवर्ती खाट आरक्षण प्रणालीविषयी प्रशिक्षण देण्यासाठी बुधवारी एकाच वेळी शेकडो शिक्षकांना मुख्यालयात बोलाविण्यात आले. पुरेशी जागा नसतांना आलेल्या शिक्षकांमुळे राजीव गांधी भवन हे मुख्यालय गजबजून गेले. जिथे जागा मिळेल तिथे शिक्षकच शिक्षक दिसत होते. सुरक्षित अंतराचे पथ्य पाळले गेले नाही. शहरात जमावबंदी लागू आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास प्रतिबंध आहे. असे सर्व नियम पालिकेची पूर्वतयारी आणि नियोजनाअभावी अक्षरश: पायदळी तुडविले गेले.

शहरातील अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकांना खाट आरक्षण प्रणालीतील माहिती अद्ययावत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासाठी शिक्षकांची खास पथके तयार करून रुग्णालयात नियुक्त केली जाणार आहेत. या प्रशिक्षणासाठी एकाच दिवशी ७०० हून अधिक शिक्षकांना तातडीने बोलाविण्यात आले.

एकाचवेळी शेकडो शिक्षकांची गर्दी करण्याची कृती घातक असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. जमलेल्यांमध्ये कुणी बाधित असल्यास त्याचे काय परिणाम होतील, याचाही प्रशासनाने विचार केला नसल्याचा आक्षेप शिक्षक संघटनांनी नोंदविला. मुख्यालयातील सभागृहाची जेमतेम १५० ते २०० प्रेक्षक क्षमता आहे. करोनामुळे सुरक्षित अंतराच्या पथ्याचा विचार केल्यास निम्म्या क्षमतेने शिक्षकांना प्रशिक्षण देता येणे शक्य होते. टप्प्याटप्प्यानिहाय शिक्षकांना बोलावता आले असते. एकाच वेळी सर्वाना बोलावल्याने वरच्या मजल्यावर जाणाऱ्या मुख्यालयातील पायऱ्या, व्हरांडे सर्वत्र शिक्षक दिसत होते. गर्दीमुळे महिला शिक्षक जीव मुठीत धरून बसल्या होत्या. सर्वानी मुखपट्टी परिधान केली असली तरी कमी जागेत सुरक्षित अंतर राखणे अवघड झाले.

नाईलाजास्तव त्यांना गर्दीत बराच वेळ तिष्ठत बसावे लागले. सभागृहाच्या प्रवेशद्वारावर मोठी गर्दी झाली होती. प्रशिक्षणास बराच वेळ लागणार असल्याने काही महिला शिक्षकांनी व्हरांडय़ात रांगेत सुरक्षित अंतर राखून शिस्तीचे दर्शन घडविले.

करोना काळात महापालिका नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहे. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र जमण्यास प्रतिबंध आहे. सुरक्षित अंतराचे पथ्य न पाळल्यावरून कारवाई केली जाते. असे असताना शेकडो शिक्षकांची गर्दी जमवून पालिकेने स्वत: सर्व नियम धाब्यावर बसविले.

शिक्षकांची गर्दी पाहून वैद्यकीय विभागाचे अधिकारी धास्तावले. संबंधितांकडून चुकीचे नियोजन केल्यावरून काहींची कानउघाडणी केली गेल्याचे समजते. पालिकेच्या कार्यपध्दतीवर शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे.