राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांच्या विरोधात सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

फेब्रुवारी महिन्यात निघालेल्या शिक्षक बदली शासकीय आदेशावर प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने शिक्षकांच्या बदल्या व प्रलंबित प्रश्नांबाबत वेळोवेळी चर्चा करण्यात आली. पत्रव्यवहार केला. मात्र या बाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. प्रशासनाने सर्व संघटना समन्वय समितीला बदल्या निर्णयातील त्रुटी दुरूस्त करण्याचे दिलेले आश्वासन पाळण्यात आले नाही. या निषेधार्थ शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, २७ फेब्रुवारीच्या बदली विषयक शासन निर्णयात समन्वय समितीने सुचविल्या प्रमाणे बदल करावेत, शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने या वर्षांच्या बदल्या रद्द करून जाचक अटींची दुरूस्ती करावी, शाळांच्या विद्युत देयकांसाठी तरतूद करून ऑनलाईन कामांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. नोव्हेंबर २००५ नंतरच्या शिक्षकांना जुने निवृत्ती वेतन देण्यात यावे, संगणक प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ द्यावी, मासिक वेतन दरमहा एक तारखेस व्हावे, पदवीधर शिक्षकांना सरसकट ४३०० ग्रेड पे देण्यात यावा, उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदाच्या स्पर्धा परीक्षांसाठी प्राथमिक शिक्षकांस पात्र ठरवावे, शालेय पोषण आहार व बांधकामे मुख्याध्यापकांकडून काढून घ्यावीत आदी मागण्या करण्यात आल्या.

मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी केली. शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेतील मुख्याधिकाऱ्यांना दिले. मोर्चाचा समारोप शिवाजी स्टेडियम येथे झाला. मोर्चात शिक्षक मोठय़ा संख्येने सहभागी झाले.