*  शिक्षण विभाग प्रधान सचिवांचे आश्वासन *  शिक्षकांची बँक खाती राष्ट्रीयीकृत बँकेत वर्ग करणार

खासगी अनुदानित माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे थकीत वेतन देण्याची व्यवस्था येत्या आठ दिवसांत करण्याचे आश्वासन शिक्षण विभाग प्रधान सचिवांनी दिले आहेत. या दिवसांत शिक्षकांची बँक खाती राष्ट्रीयीकृत बँकेत वर्ग करणार असून त्या ठिकाणी वेतन जमा करण्यात येणार आहे. दरम्यान, आठ दिवसांत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.

जिल्ह्य़ात २२ हजार शिक्षक गेल्या चार महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत. नाशिक जिल्हा बँकेने वेतन देण्याचे दोन वेळा आश्वासन दिले होते. दोन दिवसांत वेतनाचे पैसे  बँक खात्यात जमा होतील हे तिसरे आश्वासन बँक पूर्ण करू शकली नाही. निश्चलनीकरणानंतर उद्भवलेल्या स्थितीमुळे नाशिक जिल्हा बँकेची अवस्था बिकट झाली आहे, त्यामुळे शिक्षक वेतनापासून वंचित आहेत, अशी कारणे दिली जात आहेत. शेतीसाठी कर्जपुरवठा करू न शकल्याने शेतकऱ्यांचे संतप्त पडसाद एकीकडे उमटत असताना दुसरीकडे चार महिन्यांपासून वेतन बँक खात्यातून मिळत नसल्याने परिस्थिती हलाखाची झालेल्या शिक्षकांच्या संतापाची भर पडली आहे. या संतापाच्या भरात शिक्षकांनी बँकेविरोधात शड्डू ठोकत प्रखर आंदोलन केले होते. निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर खासगी अनुदानित माध्यमिक शाळेच्या शिक्षक व मुख्याध्यापकांनी आपले रखडलेले वेतन परत मिळावे यासाठी कधी शिक्षण विभाग तर कधी बँकेची दारे ठोठावली; परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

दोन दिवसांपूर्वी अध्यक्ष व संचालकांना घेराव घालत मुख्यालयास टाळे ठोकण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी मध्यस्थी करत बँक संचालक व शिक्षक संघटना पदाधिकारी यांच्यात चर्चा घडवून आणली. त्या वेळी दोन दिवसांत खात्यावर पैसे जमा होतील, असे आश्वासन देत शिक्षकांची समजूत काढली. मात्र हा कालावधी उलटूनही शिक्षकांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत.

शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांची या शिक्षकांनी भेट घेतली. संघटनेच्या २२ हजार शिक्षकांचे वेतन चार महिन्यांपासून रखडले आहे. हा आकडा कोटींच्या घरात असतांना बँक वेतन देण्यास टाळाटाळ करत आहे. यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची व्यथा आणि संताप शिक्षकांनी सचिवांसमोर व्यक्त केला.

कोणाच्या घरी विवाह आहे तर कोणाला आजारपणासाठी पैशांची निकड आहे. वेतन मिळत नसल्याने घर चालविणे अवघड बनले आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत शिक्षण विभाग ठोस भूमिका घेत नसल्याची तक्रार संघटनांनी केली.

शिक्षकांचा प्रश्न समजावून घेत सचिव नंदकुमार यांनी सर्वाना संयम बाळगण्याचे आवाहन केले. या संदर्भात शिक्षणमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. पुढील आठ दिवसांत सर्व शिक्षकांची बँक खाती राष्ट्रीयकृत बँकेत वर्ग केली जातील आणि त्या ठिकाणी वेतन जमा केले जाईल, असे नियोजन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आठ दिवसांत त्या दृष्टिकोनातून सकारात्मक कार्यवाही न झाल्यास मंत्रालयासमोर शिक्षण विभागाच्या कारभाराविरोधात एल्गार पुकारण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला. या वेळी एस. बी. देशमुख, एस. के. सावंत, साहेबराव कुटे, सी. बी. पवार, रवींद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील २०० हून अधिक खासगी अनुदानित माध्यमिक शाळेतील २२ हजार शिक्षकांचे चार महिन्यांपासून वेतन रखडलेले आहे. जिल्हा बँकेत या शिक्षकांची खाती असून त्यातून एकावेळी केवळ दोन हजार रुपये काढता येतात. बँकेकडून वेतनाची पूर्ण रक्कम मिळत नाही. एका महिन्याचा विचार केला तर साधारणत: ५२ ते ५३ कोटी बँकेकडे जमा आहेत. पैसे जमा असल्याचा दावा संघटना करत असून बँक वेतन का देत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.