महापालिकेच्या ऑनलाइन सभेत तांत्रिक अडचणी 

नाशिक : महापालिकेच्या गुरूवारी झालेल्या ऑनलाइन सभेत आवाज येत नसल्याने आणि चित्रही अधुनमधून गायब होत असल्याने संतप्त झालेल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौर जिथे सभेचे संचालन करत होते, तिथे जाऊन गोंधळ घातला.

राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी महापौरांवर टक्केवारीसाठी सभा बोलावल्याचे आरोप केले. भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांना शिवराळ भाषेत सुनावले. वादग्रस्त विषय मंजूर करण्यासाठी जाणीवपूर्वक तांत्रिक अडथळे निर्माण करण्यात आल्याचे आरोप विरोधकांनी केले. गोंधळामुळे सभा १५ मिनिटे तहकूब करत नंतर काम पूर्ववत सुरू करण्यात आले. सफाई कामगार भरतीसाठी ठेकेदाराने गोळा केलेल्या १५ हजार रुपयांच्या अनामत रक्कम प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी ऑनलाइन सभा गुरूवारी पार पडली. पालिका आयुक्तांच्या दालनाशेजारील कक्षातून महापौरांनी सभेचे संचालन केले. यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे, स्थायी सभापती, भाजपचे गटनेते जगदीश पाटील सुरक्षित अंतर राखून सहभागी झाले. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि गटनेते आपापल्या कार्यालयातून ऑनलाइन सभेत सहभागी झाले होते. मागील ऑनलाइन सभेत फारशा तांत्रिक अडचणी आल्या नव्हत्या. यावेळी मात्र वारंवार अडचणी येत राहिल्या. आवाज मध्येच गायब होणे, तर कधी चित्र पटलावरून निघून जाणे असे सुरू झाले. यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभा रद्द करून महाकवी कालिदास कला मंदिरात सभा घेण्याची मागणी केली.

सभेचे कामकामज सुरूच राहिल्याने विरोधी पक्षनेते बोरस्ते, राष्ट्रवादीचे गटनेते  शेलार यांच्यासह काही नगरसेवक सभेचे संचालन सुरू असलेल्या दालनात पोहचले. तिथे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला.

करोनामुळे गंभीर स्थिती असतांना निव्वळ टक्केवारीसाठी महापौरांनी सभा बोलाविल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी केला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी धमकीवजा इशारे दिले. महापौरांनी शेलार यांना सभा रद्द केली जाणार नसल्याचे सुनावले. काही काळासाठी सभा तहकूब करून कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले.

पाणी करार अभ्यासासाठी समिती

प्रदीर्घ काळापासून रखडलेला महापालिका-जलसंपदा विभागाच्या कराराचा अभ्यास करण्यासाठी गट नेत्यांची समिती स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले. या कराराबाबत पालकमंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी अनेकांनी केली. या पार्श्वभूमीवर, पाणी कराबाबात गटनेत्यांची समिती नियुक्त करण्याचे महापौरांनी जाहीर केले.

अनामत रक्कम गोळा करण्याच्या प्रकरणाची चौकशी

बाह्य़ मार्गाने सफाई कामगार भरती करण्याच्या प्रक्रियेत उमेदवारांकडून १५ हजार रुपये गोळा करण्याच्या विषयावर सभेत जोरदार चर्चा झाली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी दिले. ठेकेदारी पध्दतीने ७०० सफाई कामगार भरतीचा विषय गाजत आहे. संबंधित ठेकेदाराला महापालिकेने विचारणा केली होती. त्यावर ही अनामत रक्कम असून ती काम सोडल्यानंतर संबंधित कामगाराला दिली जाईल, असा खुलासा संबंधिताने केला. प्रशासनाने अशा रक्कम आकारणीस मनाई करण्याचे पत्र दिले आहे. यावरून डॉ. हेमलता पाटील यांच्यासह अनेकांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला धारेवर धरले. अनामत प्रकरणामुळे नगरसेवकांची बदनामी होत असल्याचे सांगितले. या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.

वृक्ष गणनेवर संशय

वृक्षगणनेच्या जादा खर्चाच्या नावाखाली ठेकेदारावर तब्बल दोन लाखाहून अधिकची रक्कम देण्याच्या उद्यान विभागाच्या प्रस्तावाला थांबविण्यात आले. १२ ते १३ वर्षांत शहरातील वृक्षांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे सर्वेक्षणात आढळले. २००७ मध्ये शहरात २२.५५ लाख झाडे होती. पुढील १० वर्षांत ती जवळपास ५० लाखावर पोहोचल्याबाबत नगरसेवकांनी संशय व्यक्त केला. या प्रस्तावाची विधी विभागामार्फत पडताळणी केली जाईल. प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घ्यावा, असे महापौरांनी सूचित केले.