• व्यावसायिक विजय बिरारी यांचा संशयास्पद मृत्यू
  • शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

नाशिक : शहरातील सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या ताब्यात असताना झाल्याने हा सर्व तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे. तेलंगणा पोलीस पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बिरारी मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू आहे. बिरारी यांच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून अद्याप या संदर्भात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आलेली नाही.

बिरारी यांना ताब्यात घेतल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहातील ४०६ नंबरच्या खोलीत तेलंगणा पोलिसांनी मुक्काम केला होता. मंगळवारी बिरारी यांनी विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.

बिरारी यांच्या कुटुंबीयांनी तेलंगणा पोलिसांवर खंडणी मागितल्याचा तसेच बिरारी यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा  आरोप केला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात बिरारी मृत्यू प्रकरणाची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. बिरारी यांचा मृत्यू पोलिसांच्या ताब्यात असताना झाला आहे. हा सर्व तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करत असून अधिक्षक अजय देवरे, अपर अधिक्षक बाजीराव महाजन, उपअधीक्षक बी. डी. कोळी, वैशाली पाटील यांचे पथक हैद्राबाद पोलिसांची सखोल चौकशी करत आहे. राज्य गुन्हे अन्वेशन विभागाने घटनास्थळाची पाहणी करून शासकीय विश्रामगृहातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. काही कर्मचाऱ्यांची चौकशीही केली. तेलंगणा पोलिसांना केवळ तेलगु भाषा येते. यामुळे जबाब घेण्यात अधिकाऱ्यांना अडचणी येत आहेत. जबाबाचे लिखाण इंग्रजीमध्ये सुरू असून यामध्ये वेळ जात आहे. तसेच अद्याप कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे समोर न आल्याने गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. बिरारी यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी उशिराने किंवा शनिवारी येईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यानंतरच गुन्ह्य़ाच्या स्वरूपाची स्पष्टता होईल, असे तपास अधिकारी देवरे यांनी नमूद केले.