18 January 2019

News Flash

नववर्षांत तापमानाचा पारा उतरला

मागील १० दिवसांपासून नाशिक कडाक्याच्या थंडीने गारठले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

घटत्या तापमानास समतल भूभागासह अनेक घटक कारणीभूत – निष्कर्ष

नवीन वर्षांत तापमानाचा पारा बराच खाली उतरला असताना नाशिक शहर आणि लगतच्या निफाड तालुक्यातील तापमानात जवळपास दीड ते दोन अंशांचा फरक नेहमीप्रमाणे कायम आहे. त्यामागे समतल भूभाग, गोदावरीचे विस्तीर्ण पात्र आणि पाण्याचा मुबलक साठा, निरभ्र आकाशामुळे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता हवेत जलदगतीने फेकली जाणारी प्रक्रिया.. आदी घटक हातभार लावत असल्याचे मुद्दे या संदर्भात अभ्यास करणारे केटीएचएम महाविद्यालयाचे प्रा. किरणकुमार जोहरे यांनी मांडले आहेत.

मागील १० दिवसांपासून नाशिक कडाक्याच्या थंडीने गारठले आहे. अलिकडेच हवामानशास्त्र विभागाच्या केंद्रात ८.२ या नीचांकी तापमानाची दोनवेळा नोंद झाली. गुरूवारी तापमान ९.३ अंश होते. शहरातील केंद्रात ही नोंद होत असली तरी निफाडमध्ये पारा त्यापेक्षा खाली जातो असे आकडेवारीवरून दिसून येते. त्या भागात हवामानशास्त्र विभागाचे केंद्र नाही.

द्राक्ष बागायतदार आणि कृषी संशोधन केंद्रातील नोंदीवरून नाशिक शहर आणि निफाड तालुक्यातील तापमानातील विलक्षण फरक अनेकदा दिसून येतो. निफाड परिसरात कधीकधी दवबिंदू गोठल्याचे समोर आले आहे. निफाडमध्ये थंडीचा कडाका अधिक का असतो याचा अभ्यास केटीएचएम महाविद्यालयाचे प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केला आहे.

अभ्यासकाचे निष्कर्ष –

सखल भूभाग

निफाड हा समुद्र सपाटीपासून ५६९ मीटर उंचीवरील सखल भूभाग आहे. या तालुक्यात उंच डोंगर किंवा पर्वत नाहीत. निफाडमधील समतल भागावर हवेची घनता ही अधिक आढळून आली. या ठिकाणी हवेचा थर साठून राहतो. अधिक घनतेची हवा ही अधिक दाबाचा भाग बनविते. अधिक दाबाचा भाग म्हणजेच कमी तापमान हे सूत्र आहे. परिणामी, निफाडचे तापमान नाशिकपेक्षा नेहमीच कमी आढळत.

हिरवीगार झाडे, बागायती

निफाडमध्ये हिरवीगार झाडे आणि बागायती शेतीची पिके (द्राक्ष, ऊस, कांदा, गहू, डाळिंब) यांची रेलचेल आहे. या बाबी जास्त दाबाचा हवेचा थर टिकून ठेवते. थंड हवेमुळे आणि काळ्या कसदार जमिनीमुळे निफाडमध्ये दीपावलीनंतर लागवड होणारा रब्बी हंगामातील गहू देखील चांगल्या प्रकारे पिकतो. निफाडमध्ये वाऱ्याची गतीही कमी आढळते. जी तापमान कमी ठेवण्यास पूरक आणि महत्वाचा भाग ठरत.

मुबलक पाणी

निफाडचे तापमान कमी राहण्यास मुबलक पाणी हातभार लावते. या तालुक्यास गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र लाभले आहे. त्यामुळे मोठा जलसाठा जमिनीत होतो. निफाडमध्ये पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. जमिनीचे तापमान कमी ठेवण्यास तो उपयोगी ठरतो. परिणामी हवेचे तापमान देखील घटते. या परिसरात आकाश निरभ्र असते. त्यामुळे दिवसा जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता लवकर हवेत फेकली जाते आणि जमिनीलगतचा तापमान वेगाने घटते आणि थंडी वाढते.

First Published on January 5, 2018 2:37 am

Web Title: temperature decreases in nashik