स्थानिक अर्थकारणाला गती नाही, व्यावसायिक, दुकानदार नाराज

नाशिक : परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटक, भाविक यांना करोना चाचणी आवश्यक करण्यात आल्याने त्याचा परिणाम देवस्थान, पर्यटनस्थळांवर होणाऱ्या गर्दीवर झाला आहे. त्र्यंबक देवस्थानही यास अपवाद नाही. मंदिरे उघडून सात दिवस होऊनही अद्याप स्थानिक अर्थकारणाला गती मिळालेली  नाही. त्यामुळे व्यावसायिक, दुकानदारांमध्ये नाराजी आहे. लोकांच्या सततच्या मागणीमुळे धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. परंतु,  अद्याप अर्थकारणाला अपेक्षित  गती मिळालेली नाही. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले  त्र्यंबके श्वारही यास अपवाद नाही. त्र्यंबके श्वार देवस्थानाभोवती संपूर्ण शहरासह परिसरातील गावांचे अर्थकारण अवलंबून आहे. या ठिकाणी पूजेचे साहित्य, कपडा दुकान, प्रसादाची दुकाने आहेत. तसेच पूजेसाठी पुजाऱ्यांकडे मुक्कामी राहणाऱ्या भाविकांची  ऊठबस सांभाळण्यासाठी  पुरोहितांच्या घरी स्वयंपाक, घरकामासाठी काही जण राबत असतात. नारायण नागबळी, त्रिपिंडी पूजेसाठी देश-विदेशातून भाविक या ठिकाणी येतात.

मंदिरे खुली झाल्याने या ठिकाणी प्रशासकीय नियमांचे पालन करून पूजा सुरू झाल्या आहेत. परंतु, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्टात हवाई, रेल्वे, रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना करोना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल आवश्यक करण्यात आला आहे. अहवाल सकारात्मक असेल तरच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे संबंधित राज्यांतून त्र्यंबकला येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर  याचा परिणाम झाला आहे.

स्थानिक व्यवसायांनाही त्याचा फटका बसला आहे. मंदिर परिसरात भाविकांची तसेच पर्यटकांची संख्या मर्यादित असल्याने आर्थिक उलाढालीला फारशी चालना मिळालेली नाही. मंदिरे सुरू झाल्यावर अनेकांनी गर्दी वाढेल, या अपेक्षेने उधारउसनवारी करून माल भरला आहे. परंतु, गर्दी नसल्याने व्यावसायिकांसह अन्य घटकांवर तिष्ठत बसण्याची वेळ आली आहे.

यासंदर्भात पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी मत मांडले. त्र्यंबक देवस्थान परिसरात भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. पूजेसाठीही आवश्यक नियमावलीचे पालन सुरू आहे. परंतु, अद्याप अपेक्षित गर्दी झालेली नाही. गुजरातमधून आरोग्य तपासणी करून नागरिकांना बाहेर सोडले जात असल्याने गुजरातकडील पर्यटक, भाविकांची संख्या कमी आहे. के वळ अर्ध्या  तासात दर्शन घेऊन लोक  बाहेर पडत आहेत, असे गायधनी यांनी नमूद केले.