गंगापूर धरणातून पाणी न सोडण्यासाठी ठिय्या आंदोलन

गंगापूर धरणाचे गुरुवारी उघडलेले दरवाजे सायंकाळी बंद करून जायकवाडीला पाणी सोडण्यास दिलेली तात्पुरती स्थगिती कायमस्वरूपी करावी, या मागणीसाठी शुक्रवारी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सिंचन भवनसमोर ठिय्या आंदोलन केले.

जायकवाडीची तूट भरून काढण्यासाठी नाशिक, नगरमधील धरणांमधून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश झाल्यापासून त्याविरोधात स्थानिक पातळीवर आंदोलनाचे सत्र सुरू आहे. जायकवाडीसाठी नाशिकमधील गंगापूर आणि पालखेड समूहातून प्रत्येकी ६०० आणि दारणा धरण समूहातून २०४० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार गुरुवारी गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणांतून विसर्ग करण्यात आला.

गंगापूर, पालखेड समूहाच्या फेरनियोजनानुसार किमान गरजा लक्षात घेतल्यास धरणातून सोडण्यासाठी पाणी शिल्लक राहत नसल्याचा अहवाल गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास सादर झाला आहे. ही बाब जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर मांडली गेली. प्राधिकरणाने गंगापूर, पालखेड समूहात तूट असल्याने पाणी सोडू नये असे निर्देश दिले. प्राधिकरणासह जलसंपदा विभागाच्या स्थानिक कार्यालयाने महामंडळाकडे वारंवार अंतिम निर्णय मागूनही तो मिळाला नाही. अखेर सायंकाळी गंगापूरमधून पाणी सोडण्याची कार्यवाही थांबविण्यात आली.

अंतिम आदेश येईपर्यंत गंगापूर, पालखेड समूहातून पाणी सोडण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली. तात्पुरती स्थगिती कायमस्वरूपी करावी, या मागणीसाठी सकाळी शेतकरी त्र्यंबक रस्त्यावरील सिंचन भवनसमोर धडकले.

देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या संदर्भात दुपापर्यंत महामंडळाकडून कोणताही निर्णय आला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

प्राधिकरणाकडून दिरंगाई

गंगापूरमधून नाशिक शहराला पाणीपुरवठा केला जातो. औद्योगिक वसाहतींसह सिंचनासाठी धरणातील पाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षित केले आहे. बाष्पीभवन आणि तत्सम बाबी लक्षात घेऊन धोरण तीननुसार गंगापूर धरणाच्या किमान गरजा भागविण्यासाठी पाणी शिल्लक राहत नाही. यामुळे गंगापूरऐवजी मुकणे किंवा अन्य धरणातून त्याची पूर्तता करावी हा विषय आधीच प्राधिकरणासमोर मांडला गेला आहे. महामंडळ निर्णय घेण्यास कालापव्यय करीत असल्याचा आक्षेप शेतकऱ्यांनी नोंदविला.