दोन जण अद्याप फरारच; शोधासाठी पथके तयार
बालसुधारगृहातील सुरक्षा व्यवस्था भेदून पळून गेलेल्या बाल गुन्हेगारांना शोधण्यात यंत्रणेची चांगलीच दमछाक होत असून मंगळवारी दुपापर्यंत आणखी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे त्यांची संख्या दहावर गेली आहे. दोन जण अद्याप फरार आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत कारागृह प्रशासनाने दोन सुरक्षारक्षकांना तात्काळ निलंबित केले. पळालेल्यांच्या शोधासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत.
त्र्यंबक रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयालगत असलेल्या विस्तीर्ण आवारात हे किशोर सुधारालय आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या आकारातील आठ बॅरेक असून प्रत्येक बराक समोर सहा विभाग आहेत. राज्यातील वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील २२ अल्पवयीन गुन्हेगार व संशयितांना न्यायालयाच्या निर्देशानुसार या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे एका बराकमधील आठ संशयितांनी सगळीकडे शांतता झाल्यानंतर लोखंडी दार ब्लेडच्या सहाय्याने कापले.
बाहेर आल्यानंतर शेजारील बराकमधील चार जणांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकाच्या ताब्यात असलेली चावी ताब्यात घेऊन त्यांनाही बाहेर काढले. त्यानंतर या १२ जणांनी अंधाराचा फायदा घेत १५ फूट उंचीची भिंत चादरीचा दोरखंड तयार करत पार केली. या सर्व घडामोडींचा थांगपत्ता सुरक्षारक्षकांना लागला नाही. पहाटे ही बाब लक्षात आल्यावर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.
या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तातडीने सर्वत्र नाकाबंदी केली गेली. संशयितांना आतुन कोणी रसद पुरविली की बाहेरील कोणी व्यक्ती सुधारालयातील त्रुटी जाणून होता, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यावर कारागृह प्रशासनाचे महानिरीक्षक भूषण उपाध्याय यांनी सुधारालयास भेट देत रात्र पाळीत काम करणाऱ्या राजेंद्र झाल्टे, भास्कर भगत यांना तात्काळ निलंबीत केले. उर्वरीत कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, फरार संशयितांपैकी काहींनी दुचाकी वाहनाची चोरी करत पुणे गाठण्याचा प्रयत्न केला. यात दोन जणांना सायंकाळपर्यंत पुण्यातील निगडी येथे ताब्यात घेण्यात आले तर उर्वरित आठ जणांचा मंगळवारी सायंकाळपर्यंत छडा लावण्यात यश आल्याचे पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांनी सांगितले.