हाणामारीप्रकरणी १९ जण ताब्यात

मनमाड रेल्वे स्थानकावर अनधिकृतरीत्या खाद्य तसेच पेय विक्रीप्रकरणी दोन गटांतील वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे बुधवारी दिवसभर मुख्य बाजारपेठेसह शहर परिसरात तणाव होता. पोलिसांनी ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून १९ जणांना ताब्यात घेतले आहे.

मनमाड रेल्वे स्थानकातील खाद्य आणि पेय विक्रीवरून स्थानिक दोन गटांत वाद आहे. प्रतिस्पध्र्याला अद्दल घडविण्यासाठी एका गटाने मुंबईहून २० भाडोत्री गुंड बोलावून मंगळवारी रात्री आठ वाजता जमधाडे चौकातील बावन्न नंबर, इंडियन हायस्कूलजवळचा परिसर गाठला. परिसरात उभ्या असलेल्या दुचाकीवर तलवारी आणि अन्य शस्त्रे आपटत वाहनांचे नुकसान करण्यात आले. दिसेल त्या व्यक्तीला मारहाण करून परिसरात दहशत माजविण्यात आली. समीर ऊर्फ पापा शेख याच्या घरात शिरून त्याला घराबाहेर ओढण्यात आले. चॉपर आणि इतर साहित्याने संशयित इलियास इस्माईल सय्यद आणि अन्य १८ जणांनी तसेच बाहेरच्या २० गुंडांनी त्याला जबर मारहाण केली. समीरला मदत करण्यासाठी येणाऱ्यालाही मारहाण करण्यात आली. मारहाणीत समीरचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

संशयितांना अटक करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेण्यार नाही असा पवित्रा घेत समीरच्या नातेवाईकांनी बुधवारी पोलीस ठाण्यावर ठिय्या दिला. साहाय्यक पोलीस अधीक्षिका रागसुधा यांनी नातेवाईकांशी चर्चा करत संशयितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांची समजून निघाली. या घटनेप्रकरणी समीरची पत्नी नुसरत शेख यांनी संशयितांविरुद्ध तक्रार दाखल केली. वेगवेगळी पथके तैनात करत पोलिसांनी १९ जणांना ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली.

परिसरात भीतीचे वातावरण असून शहरातील मुख्य बाजारपेठेसह अन्य काही दुकाने बंद राहिली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ठसे तज्ज्ञपथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी परिसरात तळ ठोकून आहेत.

अवैध व्यावसायिकांना राजकीय पाठबळ

मनमाड रेल्वे स्थानकात अनधिकृत खाद्यपेय विक्रीच्या वादातून हाणामारीचे प्रकार तसे नवे नाही. त्याचे पडसाद नेहमी शहरात उमटतात. रेल्वे, रेल्वे पोलीस दल आणि शहर पोलिसांची बोटचेपी भूमिका राहिली आहे. विक्रेत्यांना राजकीय पक्षांचे, पदाधिकाऱ्यांचे  मिळणारे पाठबळ यामुळे गुंडांची दहशत वाढत आहे. दोन महिन्यांपूर्वी भर बाजारपेठेत हाणामारीचे प्रकार घडले होते. त्यातही ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गणेश उत्सवात पुन्हा वाद उफाळला. त्याची पोलिसांनी गंभीर दखल न घेतल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली, अशी परिसरात चर्चा आहे.

सर्व आरोपींना अटक करणार

मनमाड शहरातील वाढत्या गुंडगिरीविरुद्ध तातडीने कडक कारवाई केली जाईल. घडलेल्या प्रकाराची चौकशी सुरू आहे. सर्व संशयितांना त्वरित अटक होईल.

– संजय दराडे  जिल्हा पोलीस अधीक्षक