दोन गटांत झालेल्या वादावादीमुळे शिरपूर शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. वाहनाने कट मारल्याच्या कारणावरून हा वाद झाला. या पाश्र्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही गटांच्या २६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिरपूरमधील कॉलनी परिसरातील बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका युवकाला गुरे भरलेल्या गाडीने कट मारला. या कारणावरून दोन गटांत वाद उफाळून आला. पाटील वाडा आणि आंबेडकर चौक परिसरात मोठय़ा प्रमाणात जमाव जमला. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. मात्र काही युवकांनी बाजार समितीत प्रवेश करून या ठिकाणी गुरू भरलेल्या १० ते १२ वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. ही माहिती समजल्यानंतर तणावात भर पडली. पोलीस प्रशासनाने प्रसंगावधान राखत दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हेदेखील घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असून तणावपूर्ण शांतता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्तात वाढ करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरा दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या. त्यात सागर रामराव सोनवणे (पाटील) याने दिलेल्या तक्रारीवरून वाहनाने कट मारल्याचा जाब विचारल्यावरून रईस खाटीक याने साथीदारांच्या मदतीने मारहाण केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी रईस गुलाब खाटीक, अरुण थोरात, विशाल थोरात, सुनील वानखेडे, मनोज शिरसाठ, आकाश शिरसाठ, अजय पाटोळे, बाबा पाटील, संदेश थोरात, संतोष मोरे, पिंटू खैरनार, पंकज बाविस्कर, विक्की शिरसाठ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुसरी फिर्याद रईस खाटीकने दिली आहे. छोटा हत्ती वाहनात बैल भरून कामखेडा येथे निघालो असताना आपली गाडी अडवून सागर पाटील याच्यासह असलेल्यांनी खिशातील १३ हजार रोख आणि गाडीचा परवाना हिसकावून नेले. त्यावरून सागर पाटीलसह दीपक पाटील, सागर पाटील, जितेंद्र सुनील पाटील, आनंद पाटील, मनोज माळी, संभा पाटील, मुन्ना माळी, भय्या माळी, पंकज मराठे आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.